केदारनाथा, मनी नाही भाव...

    09-Nov-2023   
Total Views |
mahadev app scam and Uddhav Thackeray Kedarnath Visit


'महादेव’ अ‍ॅपवर कारवाई झाली. त्यामध्ये छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप कऱण्यात आले आहेत. पण, याबद्दल उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ”छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल भाजपमध्ये गेले, तर ‘महादेव’ अ‍ॅपचे ‘हर हर महादेव’ अ‍ॅप बनेल.” देवांचा देव महादेव यांच्याबाबत असे म्हणणारे, दुसरे-तिसरे कुणी नसूच शकते. इतके असंबद्ध आणि हिंदू श्रद्धांवर प्रहार करणारे वक्तव्य उद्धव ठाकरेच करणार, यात काय शंका? पण, काही दिवसांपूर्वी हेच उद्धव कुटुंबासकट महोदवाची पूजा करायला केदारनाथमध्ये गेले होते. हेसुद्धा त्यांचे राजकीय ढोंग होते, असेच म्हणावे लागेल.
असो. ‘महादेव’ सट्टेबाजी अ‍ॅपच्या शुभम सोनीने सांगितले की, “भ्रष्ट, अनैतिक ‘महादेव’ अ‍ॅपचा छत्तीसगढमध्ये कारभार वाढावा, यासाठी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मदत केली. त्यासाठी भूपेश बघेल यांनी ५०३ कोटी रुपये घेतले.“ याचाच अर्थ छत्तीसगढमध्ये जनतेला सट्टेबाज बनवण्यासाठी भूपेश बघेल यांनी लाच घेतली. राज्याचा मुख्यमंत्रीच जर सट्टेबाजांना राज्यात प्रोत्साहन देण्यासाठी लाच घेत असेल, तर इतरांची काय कथा सांगावी? मुख्यमंत्री राज्यातील लोकांचे कल्याण व्हावे, यासाठी सत्तेत असतो. पण, भूपेश यांनी काय केले? भोळ्याभाबड्या, गरीब व वनवासी जनतेला सट्टा बाजारात लोटले. आजही छत्तीसगढमध्ये सामान्य लोक आणि प्रशासकीय वर्ग नक्षली कारवायांनी त्रस्त आहे. काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाने नारा दिला होता की, ‘भयभूक भ्रष्टाचारमुक्त भारत.’ पण, काँग्रेस सरकारने छत्तीसगढमध्ये भयभूक-भ्रष्टाचाराचे वातावरण पुन्हा निर्माण केले. राजकारण आणि हिंदू समाजाची सद्यस्थिती त्यांना माहिती आहे. भूपेश बघेल आणि त्यांची कारकिर्द तर सांगायलाच नको.या असल्या भ्रष्ट व्यक्तीच्या समर्थनार्थ महादेवाच्या नावाचे विंडबन करणार्‍या ठाकरेंना काय म्हणावे? यावरही काही लोक म्हणतात की, मोदी हिमालयात जातात. महादेवाची पूजा करतात. तसे आपणही केले, तर आपणही पंतप्रधान बनू, असे उद्धव यांना वाटले. पण, पंतप्रधान तर सोडाच, ग्रामपंचायतमध्येही निराशाच मिळाली. कारण, ‘मनी नाही भाव, देवा मला पाव’ हे महादेवाला आवडणारे नाहीच!

 
वेगळेपणाच्या शुभेच्छा...


नुकतेच छत्तीसगढमध्ये राहुल गांधी म्हणाले की, “भाजप तुम्हाला ‘वनवासी’ म्हणतो. पण, ‘वनवासी’ आणि ‘आदिवासी’ या दोन शब्दांमध्ये फरक आहे. ‘आदिवासी’ शब्दामध्ये तुमचा हक्क म्हणजे जल, जंगल, जमिनीचा हक्क सामावलेला आहे.” वनवासी आणि आदिवासी शब्दाचा फरक सांगताना राहुल काय सूचित करू इच्छितात की, संविधानामध्ये अनुसूचित जमातीमध्ये वर्गीकृत केलेल्या जमाती फक्त जल, जमीन आणि जंगलाच्या अधिकारी आहेत? मालक आहेत. ते इथले मूळ निवासी आणि बाकी सगळे देशवासी बाहेरून आलेले आहेत? लोकांना आपसात विभाजित करून, त्याद्वारे कोणत्या तरी एका गटाचे लांगूलचालन करून सत्ता प्राप्त करावी, हेच राहुल गांधी यांचे आजन्म ध्येय. कारण, २०१४ नंतर सामाजिक, राजकीय आणि धार्मिकदृष्ट्याही सजग झालेले भारतीय त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे राहुल कधीही सत्तेत येणार नाहीत. या आयामात सत्तेत येणे, हेच राहुल यांचे आजन्म ध्येय राहणार, हे नक्की. याच छत्तीसगढच्या सभेमध्ये राहुल यांनी जावईशोध लावला. ते म्हणाले की, ”भाजपची इच्छा आहे की, तुम्ही इंग्रजी शिकू नये.” राहुल यांनी सभेनंतर छत्तीसगढच्या जंगलातही जावे. छत्तीसगढ आणि झारखंडसारख्या वनवासीबहुल राज्यांमध्ये काय स्थिती आहे? कोणत्याही मूलभूत सोईसुविधांना नक्षली हिंसात्मक विरोध करतात. प्रसंगी जीवही घेतात. मात्र, याच वनवासी पाड्यांमध्ये ‘तुमच्या मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश देतो, भाताची भरपेट पेज देतो’च्या बोलीवर वाड्याच्या वाड्या ख्रिस्ती करणारे फादर आणि चर्चसंस्था सक्रिय आहेत. त्यांना तिथे नक्षल्यांकडून अभय आहे. अपवाद वगळता या क्षेत्रातील कॉन्व्हेंट स्कूल धर्मांतराचे अड्डे झाले आहेत. ‘तोडास, फोडा आणि राज्य करा’ ही घातक प्रवृत्ती परक्या इंग्र्रजांची होती. तेच तंत्र आता राहुल गांधी वापरत आहेत. अनुसूचित जमातींना ‘मूल निवासी’ म्हणत राहुल त्या बांधवांना इतर समाजापासून वेगळेे ठरवत आहेत. यावर काही लोक म्हणतात की, त्यांनी वनवासी बांधवांना इतर भारतीयांपासून वेगळे करण्याचे ठरवले, तरी भारतीय वेगळे होणार नाहीत. उलट अशा विफल प्रयत्नांनी विफल होत-होत, हाताच्या बाह्या वर सरसावत राहुल विफलतेने म्हणतील की, देखो भैय्या! असा कसा, असा कसा, मी वेगळा. त्यामुळे राहुल यांना धनत्रयोदशीला वेगळेपणाच्या शुभेच्छा!




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.