मुंबई : मुंबई महापालिका परिसरासह उपनगरीय भागातील हवेचा एक्युआय समाधानकारक असून आता हवेचा दर्जा हळूहळू सुधारत असल्याचे चित्र आहे. बुधवारपासून मुंबईतील हवा चांगल्या दर्जाची असल्याची नोंद करण्यात आली आहे, याला मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दुजोरा दिला असून, मुंबईतील एक्यूआय आता आधीपेक्षा कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एक्युआय चांगल्या दर्जावर यावा, यासाठी आणखी प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान, मुंबईतील नागरिकांना मास्क लावण्याची अद्याप गरज नसल्याचे चहल यांनी सांगितले.
आयुक्त चहल यांनी सर्व पालिका रुग्णालयाच्या अधिष्ठातासोबत चर्चा केली. रुग्णालयात अस्थमा किंवा इतर आजारांच्या रुग्णांच्या वाढीसंदर्भात माहिती घेतली असता अद्याप पालिका रुग्णालयात या आजारांच्या रुग्णांची संख्या जास्त वाढली नसल्याचे सांगितले. त्यामुळे, सद्यस्थितीत रुग्ण वाढले नसून काळजीचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, पालिका प्रशासनाने होणार्या प्रदूषणावर आता तोडगा काढण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी वेगवेगळया उपाययोजना केल्या जात आहेत. पालिका प्रशासनाने एकूण २७ मुद्द्यांची मार्गदर्शक सुचना तयार केली आहे, त्यात मुंबईतील रस्ते स्वच्छ करण्यापासून दर आठवड्याला एक्युआयची पातळी तपासली जाणार आहे.
यासह पोलिस प्रशासनही यात जातीने लक्ष देणार आहे. सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेनंतर कोणीही नियम न पाळल्यास कारवाई होणार आहे. शिवाय, मुंबईच्या प्रवेश मार्गावर स्प्रिंकल सिस्टम बसवली जाणार आहे. एक मोबाईल ॲप तयार केले जाणार असून नागरिकांच्या येणार्या तक्रारीवर तात्काळ तोडगा काढला जाईल. या संदर्भातील नोटिस जाहीर करण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई चा इशाराही चहल यांनी दिला आहे. बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण होताना आढळले तर बांधकाम थांबवण्याचे ही आदेश देण्यात येतील. दिल्लीच्या पार्श्वभूमीवर गरज पडल्यास मुंबईतही कृत्रिम पाऊस पाडला जाईल.