विवेकचे कार्य समाजात संस्कृती आणि राष्ट्रीय विचार पोहोचवणारे : मंत्री मंगलप्रभात लोढा

मान्यवरांच्या उपस्थितीत सा.विवेकच्या दीपावली विशेषांकाचे प्रकाशन

    08-Nov-2023
Total Views | 33
Weekly Vivek Diwali Ank Publish

मुंबई :
"समाजात संस्कार, संस्कृती व राष्ट्रीय विचार पोहोचविण्याचे प्रभावी कार्य विवेक सातत्याने करत आहे. पुढेही करत राहील, याची खात्री आहे.",अशा शब्दांत विवेकचे महत्त्वपूर्ण योगदान राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अधोरेखित केले. निमित्त होते, साप्ताहिक विवेकच्या दिवाळी अंक प्रकाशनाचे मुंबईतील वडाळा येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या चंचल स्मृती सभागृहात दिवाळी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. त्यांच्यासह मंचावर प्रसिद्ध उद्योजक रामसुंदर झा, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, पद्मश्री रमेश पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी साप्ताहिक विवेकशी १९९५पासून स्नेह असल्याचे आवर्जून नमूद केले. राजकीय क्षेत्रातील वाटचालीच्या सुरुवातीच्या काळात विवेकने केलेल्या मदतीची कृतज्ञतापूर्वक नोंद करत ते म्हणाले,"माझ्या कार्याची पहिली दखल विवेकनी घेऊन विशेषांक प्रकाशित केला. त्यामुळे माझे नाव अनेकांपर्यंत पोचले. परिणामी पहिल्याच निवडणुकीत मी विजयी झालो."

प्रास्ताविकातून विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी विवेकच्या अमृतमहोत्सवी वाटचालीवर आणि दीपावली विशेषांकावर प्रकाश टाकला. यावेळी विवेकच्या दीपावली विशेषांकासाठी विशेष योगदान देणारे विवेकचे पालक व प्रतिनिधी गुरूराज कुलकर्णी (पनवेल) विलास मेस्त्री (वसई), रवींद्र कराडकर (ठाणे), गणपत रहाटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तर उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल प्रसिद्ध व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते सी.ए.एन.आर.परमेश्वरन् यांचाही सन्मान करण्यात आला.

सा.विवेकचे कार्यकारी प्रमुख राहुल पाठारे, तरूण भारतचे संपादक किरण शेलार , विवेकचे सह कार्यकारी संपादक रवींद्र गोळे, पार्कचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम शंकरनारायणन यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सा. विवेकच्या उपसंपादक पूनम पवार यांनी केले तर आभारप्रदर्शन विवेकचे वर्गणी-विक्री सहप्रमुख दयानंद शिवशिवकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
 
विवेक दीपावली विशेषांकाचे वैशिष्ट्ये

यंदाचे वर्ष साप्ताहिक विवेकचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने विवेकचा दीपावली विशेषांक 'इंडिया की भारत? देशाच्या नावावरून चालू असलेल्या वादावर प्रकाश टाकणारा प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांचा लेख वाचकांना बौद्धिक मेजवानी देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वगुणाची ओळख देणारा लेख ज्येष्ठ विचारवंत, पद्मश्री रमेश पतंगे यांनी लिहिला आहे. अवकाश अभ्यासक रूचिरा सावंत यांनी 'इस्त्रो'च्या वाटचालीवर प्रकाश टाकला आहे. दीपक जेवणे यांनी विवेकच्या ७५ वर्षाचा पट उलगडणारा लेख लिहिला आहे. रवींद्र गोळे, अश्विनी मयेकर, शेफाली वैद्य, दीपाली पाटवदकर,विनिता तेलंग, रवी वाळवेकर, मंगला गोडबोले, डॉ ‌क्षमा शेलार आदींच्या कसदार लेखनाने विशेषांक वैशिष्ट्यपूर्ण झाला आहे. याखेरीज कुटुंबातल्या वाढत्या विसंवादामागची कारणे व त्यावरील उपाय समजून घेण्यासाठी या विशेषांकात विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.राजेंद्र बर्वे, डॉ.मयुरेश डंके आणि अँड. जाई वैद्य यांचा या परिसंवादात सहभाग आहे. यासोबत कृषी प्रक्रिया उद्योग विश्वाची ओळख करून देणारी विशेष पुरवणी वाचकांच्या ज्ञानात नवी भर घालणारी आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121