मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अनंत रामचंद्र जाधव (६३) यांना सोमवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी देवाज्ञा झाली. गेले काही महिने ते न्युमोनियाशी झुंज देत होते. मुंबईतील एका खासजी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रात्री ८.१५ वा. च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. परिचयातील सर्व स्वयंसेवक त्यांना प्रेमाने 'बावा शिक्षक' म्हणायचे.
अनंत जाधव हे वयाच्या १८ व्या वर्षी संघाच्या संपर्कात आले. अत्यंत प्रसन्न चित्त, चेहऱ्यावर कायम स्मित हास्य, त्यांची वाणी तेजस्वी असली तरी ते एक कर्मठ संघ स्वयंसेवक आणि कडवट हिंदुत्ववादी विचारांचे होते. आग्रिपाडा, भायखळा येथे त्यांनी आपल्या शाखेच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या विचारांची संघाची फळी आणि पिढी घडवली. त्यांना क्रिकेट आणि हुतुतूची प्रचंड आवड असल्याने आपल्या आग्रिपाड्याच्या शाखेत त्यांनी कित्येक सामने खेळले व नंतर भरवलेही.
संघदृष्ट्या प्रथम वर्ष शिक्षित असणारे अनंत जाधव यांनी सुरुवातीला रिलायन्स कंपनीत नोकरी केली. त्यानंतर स्वतःचा स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय सुरु केला. पुढे यशवंत भवन येथे व्यवस्थापक म्हणून कार्य पार पाडले. त्यानंतर विश्व संवाद केंद्र आणि यशवंत भवन येथे संगणक चालकाची भूमिकाही त्यांनी पार पाडली. याच काळात मुंबईतील संघाच्या मुख्य शिक्षकापासून ते अखिल भारतीय कार्यकर्त्यांसोबत, प्रचारकांसोबत त्यांचा सर्वांशी परिचय होत गेला.
राम मंदिर आंदोलनापासून ते राम मंदिर निधी संकलनापर्यंत संघाच्या सर्व कार्यक्रमात त्यांनी आग्रही भूमिका निभावली. कोरोना काळात त्यांच्या पत्नीचे निधन झाले, त्यानंतर ते मानसिकदृष्ट्या खचले; परंतु सर्वांना मदत करणे, भरकटलेल्याला उत्तम समुपदेशन करणे, वयाची मर्यादा न बाळगता सर्वांसोबत मित्रत्वाच्या नात्याने वागणे, अडल्या नडल्याला आधार देणे या सर्व गोष्टी त्यांनी शेवटपर्यंत केल्या. हिंदु धर्मावर प्रेम आणि संघावर प्रचंड निष्ठा असलेल्या या स्वयंसेवकांचे शरीर थकलेले होते मात्र मन शेवटच्या श्वासापर्यंत शांत आणि प्रसन्न होते.