ठाणे : विहंग चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी आणि रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट यांच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्र. ५ मधील बालमित्रांसाठी `बच्चो की मस्ती की दिवाली' व दिवाळीच्या पूर्वसंध्येनिमित्ताने नागरिकांसाठी 'सुरमयी दिवाळीची पुर्वसंध्या' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उपवन जेट्टीवर येत्या शनिवारी (ता. ११) सायंकाळी मुलांना धम्माल करता येणार असून, नागरिकांसाठी संगीताची मेजवानी मिळणार आहे.`विहंग चॅरिटेबल ट्रस्ट'च्या अध्यक्षा व माजी नगरसेविका परिषा सरनाईक, `रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी'चे देवेंद्रभाई शहा, `रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट'चे नासीरभाई शेख,`इंडियन एअर फोर्स'चे माजी सैनिक दत्तात्रय उतेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मुलांचे आवडते चाचा नेहरू यांची जयंती व दिवाळीच्या पूर्वसंध्येनिमित्ताने शिवाईनगरसह प्रभाग क्र. ५ मधील मुलांसाठी शनिवारी सायंकाळी चार ते सहापर्यंत `बच्चो की मस्ती की दिवाली' कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेशिका असून, मुलांना प्रवेशिका देण्यात आल्या आहेत. तर ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांची दिवाळी स्मरणीय करण्यासाठी सायंकाळी ६.३० वाजता `सुरमयी दिवाळीची पुर्वसंध्या' कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात संगीताची बहारदार मैफल रसिकांना अनुभवायला मिळेल. या वेळी फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीबरोबरच आकर्षक रांगोळी व लक्षवेधी किल्लेही नागरिकांना पाहता येणार आहेत.