पुणे : सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी आता शिवसेना आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी उबाठा गटाचे आदेश बांदेकर यांच्याकडे हे पद होते. या नियुक्तीवर आता उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे ट्विट करत म्हणाले, "दादरमध्ये ह्यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आलं. नंतर पोलिसांनीही सांगितलं की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती. त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे- भाजप सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले. हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, अटक व्हायला हवी होती! पण... ह्या कृत्याबद्दल त्याला बक्षीसच मिळाल्याचं दिसतंय! मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व? आमच्या सणवाराला, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे हे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात? खरंतर भाजपा किंवा गृहमंत्र्यांकडून ह्या गोष्टीचा विरोध व्हायला हवा होता... पण कदाचित हे गद्दारीचं आणि महाराष्ट्रद्वेषाचं बक्षीस दिलं असेल..." असं ते म्हणाले.