मुंबई : दीपोत्सवाच्या प्रकाशपर्वानिमित्त चटपटीत फराळाबरोबरच दिवाळी अंकाच्या साहित्यिक फराळाचीही चोखंदळ वाचकांना तितकीच प्रतीक्षा असते. तेव्हा, दरवर्षीप्रमाणे यंदाही विषय वैविध्याने नटलेला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा दिवाळी अंक प्रकाशित झाला असून वाचकांसाठी उपलब्ध आहे.
साहित्य, आंतरराष्ट्रीय जगत, समाजशील प्रकल्पांची ओळख, आरोग्य अशा विविधांगी विषयांना वाहिलेला असा हा यंदाचा दिवाळी अंक. त्यासोबतच कथा, कविता आणि अन्य वाचनीय मजकुराची मेजवानी. तेव्हा दै. ‘मुंबई तरुण भारत’चा अंक अगदी घरबसल्या ‘अॅमेझॉन’वरून एका क्लिकवर ऑर्डर करू शकता.
काय आहे यंदाच्या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य?
मुक्त संवाद
ख्यातनाम लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांच्या ‘भारतीय विरागिनी’ या पुस्तकावरील मान्यवर लेखिका-अभ्यासिका यांच्या पुणे येथे आयोजित मुक्त संवाद कार्यक्रमाचे शब्दचित्रण सर्वस्वी ज्ञानात भर घालणारे ठरावे असेच....
महाराष्ट्रातील सौरक्रांती
सौरऊर्जेवर आधारित योजनांची महाराष्ट्रात परिणामकारकरित्या अंमलबजावणी करुन राज्यातील शेतकर्यांना सौरसमृद्ध करणार्या महाराष्ट्रातील सौरक्रांतीचा विश्वास पाठक यांनी मांडलेला लेखाजोखा...
कुरुंदकरी कुलोत्पन्न सत्यशोधक
ज्येष्ठ साहित्यिक आणि व्याख्याते प्रा. शेषराव मोरे यांचे हे अमृत महोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने प्रा. मोरे यांच्या समग्र साहित्यशैलीचे विवेचन करणारा दिलीप करंबेळकर यांचा अभ्यासपूर्ण लेख...
जीवशास्त्रातील बदलत्या सांस्कृतिक पाऊलखुणा!
पशु-पक्ष्यांच्या विविध प्रजातींना ग्रीक, लॅटिन नावांच्या पलीकडे भारतीय संस्कृती, भाषा यांनुसार ओळख प्राप्त झाली आहे. त्याचा आढावा घेणारा अक्षय मांडवकर यांचा लेख...
अग्निभूमीतील अग्नितीर्थ अझरबैजानचे ज्वालाजी
अझरबैजान या देशातील अग्निपर्वत आणि अग्नितीर्थ ज्वालाजी मंदिरात भारताच्या सांस्कृतिक पाऊलखुणा धुंडाळणारा डॉ. प्रमोद पाठक यांचा माहितीपूर्ण लेख...