मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील तीन खान यांनी गेली अनेक वर्ष आपल्या चाहत्यांसाठी दरवर्षी धमाकेदार चित्रपट घेऊन येत असतातच. यावर्षी किंग खान अर्थात शाहरुख खाने याचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत, तर सलमान खानचा देखील आगामी ‘टायगर ३’ चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. मात्र, यावेळी ‘टायगर ३’ ची टक्कर दोन जबरदस्त मराठी चित्रपटांसोबत होणार आहे. या आधीही अनेकवेळा हिंदी-मराठी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर जुगलबंदी झाली आहे.
दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर नागराज मंजुळे यांचा ‘नाळ २’ व दिग्दर्शक सुजय डहाके यांचा ‘श्यामची आई’ हे दोन्ही मराठी चित्रपट १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहेत. २०१८ साली नाळ चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता, त्यावेळी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनातही भरघोस कमाई केली होती. तर १९५३ साली प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शित केलेला ‘श्यामची आई’ हा चित्रपट १९५४ साल पहिले राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे सुवर्ण कमळ पटकावणारा चित्रपट होता. त्यामुळे या दोन्ही ताकदीच्या कलाकृतींसोबत ‘टायगर ३’ चा सामना आहे.
दरम्यान, ‘श्यामची आई’ या चित्रपटात ओम भूतकर, संदीप पाठक, ज्योति चांदेकर, गौरी देशपांडेसारखे कलाकार या चित्रपट महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर ‘नाळ २’ मध्ये नागराज मंजुळे, जितेंद्र जोशी, दीप्ती देवी, देविका दफ्तरदार, श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सलमान खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘टायगर ३’ चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी फारच खास असणार यात काही शंका नाही.