कारवीची करामत

    06-Nov-2023   
Total Views |


karvi strobilanthes scorbiculata
पश्चिम घाटात सात वर्षांनी फुललेल्या कारवीने कोल्हापूरसहित पश्चिम घाट सुंदर निळ्या रंगांनी नटला आहे. सात वर्षांनी फुललेल्या या अद्वितीय वनस्पतीबद्दल सांगणारा हा लेख...

समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटात अनेक विविध वनस्पती, प्राण्यांच्या प्रजाती, पक्षी, विविध कीटक, सरपटणारे प्राणी या आणि अशा अनेक प्रजातींचा समावेश आहे. या प्रजातींमध्ये प्रत्येक प्रजातीचे स्वतःचे असे वेगळे वैशिष्ट्य असून त्यामुळे पश्चिम घाटाचं सौंदर्य अधिकच खुलतं. अशीच एक वेगळी वनस्पती प्रजात म्हणजे कारवी.
कारवी दुर्मीळ होत चाललेली एक प्रजात असून एक अद्वितीय वनस्पती आहे. पश्चिम घाटातील कोल्हापुरात सात वर्षांनी या कारवीला फुले आली आहेत. कारविया कॅलोसा हे शास्त्रीय नाव असलेली ही वनस्पती कारवी म्हणून सामान्यपणे ओळखली जाते. ‘Strobilanthes’ या जिनसमध्ये ही प्रजात मोडत असून कारवी वनस्पती पश्चिम घाटापुरतीच प्रदेशनिष्ठ असलेली प्रजात आहे. कारवीच्या काही प्रजाती दरवर्षी (वर्षातून एकदा), काही पाच वर्षांनी, सात वर्षांनी तर काही अगदी 16 वर्षांनी फुलणार्‍या प्रजातीच्या कारवी आहेत. पश्चिम घाटात कारवीच्या जवळजवळ 65 प्रजाती आढळतात. 2015 नंतर यंदा म्हणजेच ऑक्टोबरपासून कारवी या वनस्पतीने तब्बल सात वर्षांनी फुलोरा धरला आहे. आपल्या अस्तित्त्वाने पश्चिम घाट निळाशार रंगाने बहरून टाकणारी कारवी मोठ्या प्रमाणात फुले धरत असून अतिशय नयनरम्य दृश्य या दरम्यान पाहायला मिळतं. 16 वर्षांनी फुलणार्‍या कारवीच्या प्रजातीचे नाव 'Strobilanthes Scorbiculata' असे आहे.



karvi strobilanthes scorbiculata
सह्याद्री पर्वतरांगेच्या परिसरातून 12 कारवीच्या प्रजातींचे डॉक्युमेंटेशन करण्यात आले आहे. काही विशिष्ट प्रजातीच्या कारवी फुलण्याच्या कालावधीपूर्वी त्या परिसरातील काही मधमाश्यांना कारवी फुलण्याचे संकेत दिले जातात. त्यावेळी या मधमाश्या त्याच परिसरात पाहायला मिळत असून त्यांच्या परागीभवनाला सुरुवात होते. असा निसर्गतःच कारवी आणि मधमाश्यांमध्ये नातेसंबंध पाहायला मिळतात. तसेच, त्या परिसरातील कीटक, फुलपाखरांना कारवीच्या फुलांच्या परागकनांची मेजवानी मिळते. यामुळे कारवीचे परागीभवन या मधमाश्यांमार्फत निसर्गतःच केले जातात. कारवीच्या संवर्धनासाठी कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये प्रकल्प रावबिला गेला. काही दुर्मीळ कारवीच्या वनस्पतींचे संवर्धन व्हावे, या दृष्टिकोनातून जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्यात आली होती. पाळीव जनावरांना या परिसरात चराई न करण्यासाठी आवाहन, तसेच कारवी असलेल्या परिसरात वनवे लावून नये किंवा जाळून टाकू नये, याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच, कारवी फुलते त्या ठिकाणी काही कालावधीसाठी परागीभवनाच्या काळात पर्यटकांसाठी हा परिसर बंद करण्यात आला होता. वनविभागाच्या सहभागाने कारवी संवर्धन प्रकल्प राबविण्यात आला. कारवीच्या परागीभवनाच्या प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत, यासाठी यामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.
पश्चिम घाटाच्या सौंदर्यात भर घालणार्‍या या अद्वितीय वनस्पतीचा ठेवा जपण्यासाठी स्थानिक आणि वनविभाग प्रयत्नशील आहे. कारवीच्या निळाईने नटलेला सह्याद्रीचं मनोहारी चित्र यानिमित्ताने पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभं राहतंय!

(माहिती सहाय्य: योगेश फोंडे)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.