पक्षी सप्ताहानिमित्त पक्षी प्रेमींच्या उत्साहाला उधान

मुंबईत संपुर्ण सप्ताहात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

    06-Nov-2023   
Total Views |


Bird week celebrations


मुंबई (विशेष प्रतिनिधी): दरवर्षी दि. ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जाणाऱ्या पक्षी सप्ताहाच्या पार्शभुमीवर विविध संस्थांची कार्यक्रमांसाठी तयारी सुरू आहे. रविवार दि. ५ नोव्हेंबर ते रविवार दि. १२ नोव्हेंबर दरम्यान विविध ठिकाणी अनेकांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ५ नोव्हेंबर या दिवशी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन तर, दि. १२ नोव्हेंबर रोजी असणाऱ्या प्रख्यात पक्षी अभ्यासक डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधत हा सप्ताह ‘पक्षी सप्ताह’ म्हणुन राज्यात साजरा केला जातो.

पक्षी मित्र सप्ताहाचा इतिहास...


महाराष्ट्र पक्षिमित्र या संस्थेने प्रथम पक्षी सप्ताह साजरा करण्यास सुरूवात केली होती. २०१७ मध्ये विदर्भातील वर्धा येथे झालेल्या पक्षी मित्र संमेलनात आणि आंबेजोगाई येथे झालेल्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनात शासन स्तरावर ही पक्षी सप्ताह साजरा केला जावा यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला होता. २०२० साली हा प्रस्ताव मंजुर होऊन यासंबंधीचा जीआर निघाला आणि राज्य स्तरावर पक्षी सप्ताह साजरा केला जाऊ लागला.

यंदाच्या पक्षी सप्ताहाचे विशेष कार्यक्रम...


१) पक्षिमित्र – या संस्थेमार्फत अमरावती येथे अंध विद्यार्थ्यांसाठी बर्ड वॉचिंग घेतले जाणार आहे. पक्ष्यांच्या आवाजावरुन त्यांना ओळखण्याची कौशल्य या विद्यार्थ्यांना सांगितले जाते. गेल्या वर्षीपासुन पक्षिमित्र हा उपक्रम राबवत आहे. त्याचबरोबर, संस्थेचे विविध जिल्ह्यातील समन्वयक त्यांच्या पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेबरोबर ऑनलाईन वेबिनारच्या विविध सत्रांचे दि. ५ ते १० नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी होणाऱ्या पक्षी संमेलनात पक्ष्यांसाठी काम करणाऱ्या विशेष पुरस्कार दिले जातात. त्या पुरस्कारांचे मानकरी पक्षी सप्ताह सुरू होण्याच्या आदल्या दिवशी पक्षिमित्र संस्था जाहिर करते. त्याप्रमाणे, जीवनगौरव पुरस्कार दिगंबर गाडगीळ यांना जाहिर झाला आहे. राघवेंद्र नांदे यांना पक्षी संवर्धन पुरस्कार, डॉ. शिरीष मंची यांना पक्षी संशोधन पुरस्कार तर अमोल सावंत यांना यंदाचा पक्षी जनजागृती पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

२) नॅचरलिस्ट फाऊंडेशन – या संस्थेमार्फत महाराष्ट्र नेचर पार्क येथे ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत इ-बर्ड एक्सप्लोर्रस या नावाने इ-बर्डिंग ऍप्सविषयी सांगणारे सत्र आयोजित केले आहे. सकाळी ७:३० ते १०:३० या वेळेत ब्रंच विथ बर्ड्स, सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत फेदर्ड कॅनव्हासेस, महाराष्ट्र निसर्ग उद्यानात बर्ड वॉक अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

३) वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय – राणीच्या बागेत नवरंगी इंद्रधनु हे कलाप्रदर्शन सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दि. ५ ते १० नोव्हेंबर दरम्यान खुले ठेवण्यात येणार आहे. नॅचरलिस्ट फाऊंडेशन आणि राणीची बाग यांच्या समन्वयातुन ‘वन की बात’ नावाने चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी पाखरांचे गाणे अशी पक्ष्यांविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. पक्ष्यांशी ओळख करुन देणाऱ्या कार्यशाळांचा यात समावेश केला गेला असुन महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच अनेक वयोगटातील लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे सर्व कार्यक्रम नॅचरलिस्ट फाऊंडेशन आणि नॅचरलिस्ट एक्सप्लोर्रस यांच्या समन्वयातुन आयोजित करण्यात आले आहेत.

४) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी – बीएनएचएसच्या हार्नबिल हाऊस आणि इतर ठिकाणी बर्डिंग ट्रेल्स, ऑनलाईन वेबिनार काही चित्रफितींचे प्रदर्शन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. सलीम अली यांनी शुट केलेल्या फिल्म्सचे प्रदर्शन तसेच पक्षी तज्ञांचे वेबिनारमार्फत मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. त्याचबरोबर, काट्टी बगली यांच्या पक्षी कथाकथनाचा ऑनलाईन कार्यक्रम विशेषतः लहानग्यांसाठी ठेवण्यात आला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.