दिल्लीकर धुळीने त्रस्त

    06-Nov-2023   
Total Views |
Tremors felt across Delhi-NCR

राजधानी दिल्ली मागील काही दिवसांपासून गॅस चेंबर बनली आहे. दिल्लीकर धुळीने आणि धुक्याने त्रस्त झाले असून तिकडे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र प्रचारात व्यस्त दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी २०’ शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्लीचे रूपडे पालटून टाकले. चकाचक आणि चमचमती दिल्ली पाहून परदेशी पाहुण्यांना दिल्लीच्या सौंदर्याची भुरळ पडली होती. जगभरातील मीडियानेही या आयोजनाचे कौतुक केले होते. ज्या ‘जी २०’ परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी दिल्लीसह देशाचे नाव जगभरात चर्चिले गेले, त्यालाच केजरीवालांनी धुळीस मिळवले. श्वास घ्यायचा कसा, असा प्रश्न दिल्लीकरांना पडला आहे. सध्या दिल्लीमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक ५०० पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे दिल्लीतील शाळा काही दिवस बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, ० ते ५० पर्यंतचा हवेचा गुणवत्ता निर्देशांकअतिशय चांगला मानला जातो. ५१ ते १०० पर्यंतचा निर्देशांक समाधानकारक मानला जातो. तसेच, १०१ ते २०० पर्यंत मध्यम, २०१ ते ३०० पर्यंत खराब, ३०१ ते ४०० पर्यंत अतिशय खराब आणि ४०१ ते ५०० पर्यंतचा व त्यापुढील निर्देशांक हा अतिशय धोकादायक मानला जातो. मागील काही दिवसांपासूनच दिल्लीमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३००हून अधिक नोंदवला जात आहे. त्यामुळे दिल्लीकरांसाठी ही एक धोक्याची घंटा मानली जात आहे. उपराज्यपाल काम करू देत नाही, असे रडगाणे आम आदमी पक्ष सतत गात आला आहे. मात्र, दिल्लीच्या या गंभीर समस्येवर खुद्द उपराज्यपालांना पुढाकार घ्यावा लागला. त्यांनीच दिल्लीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत बैठक बोलवत आढावा घेतला. विशेष म्हणजे, या बैठकीचे निमंत्रण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही देण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री महाशयांना बैठकीला यायला वेळ नव्हता. शेवटी दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांच्याशी उपराज्यपालांनी चर्चा केली. ऐन सणासुदीच्या काळात दिल्लीकरांना घरात बसावे लागत आहे. अशुद्ध हवेने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दिल्ली गॅस चेंबर बनत असून त्याकडे लक्ष देण्याऐवजी केजरीवाल सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या माध्यमातून आणखी एक ‘भगवंत मान’ निर्माण करण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्या स्वप्नापायी दिल्लीकरांचा श्वास कोंडला जातोय, हे केजरीवालांना कोण सांगणार?

केजरीवाल प्रचारात व्यस्त!
 
केजरीवालांचे स्वप्न तर पंतप्रधानपदाची खुर्ची आहे, मात्र त्यासाठी कष्ट, मेहनत करावी लागते, याचे केजरीवालांना आजही भान नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामगिरीपर्यंत पोहोचणेही केजरीवालांना शक्य नाही आणि स्वप्न मात्र राष्ट्रीय राजकारणात वर्चस्वाची. इकडे प्रदूषित दिल्लीला वार्‍यावर सोडून मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या प्रचारात केजरीबाबू सध्या प्रचंड व्यस्त आहेत. दरवर्षी ही समस्या निकाली काढू, उपाय शोधू असे केजरीवाल सांगत राहिले. मात्र, मुख्यमंत्री होऊनही केजरीवालांनी त्यावर उपाय काही शोधला नाही. त्यातच भारत जगामध्ये नंबर वन होण्याला पंतप्रधान मोदी विरोध करत असल्याची बडबड याआधीच केजरीवालांनी केली होती. मात्र, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात अनेक विकासकामांचा धडाका सुरू आहे, हे केजरीवाल सांगत नाही. जगभरात अ‍ॅपलचा खप कमी झाला. मात्र, भारतात तो वाढला असल्याचे खुद्द अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी सांगितले. २०२४च्या अखेरपर्यंत ‘अ‍ॅपल’चे भारतातच उत्पादन होण्याची शक्यता आहे. महागड्या चारचाकींची विक्री वाढली आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये १ लाख, ७२ हजार कोटी इतके विक्रमी ‘जीएसटी’ कर संकलन झाले आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यापार्‍यांच्या ऑर्डर व्हॅल्यूदेखील वाढल्या आहे. ऑक्टोबर महिन्यात ३ लाख, ९१ हजार, ४७२ चारचाकींची विक्री झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत चारचाकीच्या विक्रीत १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा घरांच्या विक्रीतही जवळपास ३० टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे कामही वेगाने सुरू आहे. केजरीवालांना ‘ईडी’च्या चौकशीला जायला वेळ नाही. आपण कामात व्यस्त असल्याचे कारण पुढे करत केजरीवाल चौकशीला दांडी मारतात. मात्र, व्यस्त केजरीवाल दिल्लीला धुळीत आणि प्रदूषणाच्या भरोसे सोडून मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये प्रचारात दंग आहे. तन, मन आणि धनाने दिल्लीची सेवा करेल अशी शपथ केजरीवालांनी घेतली खरी. पण, ती शपथ ध्यानात ठेवून केजरीवालांनी फक्त दिल्लीवर लक्ष केंद्रित केले असते, तर अशी नाक दाबून प्रदूषणाचा वार सोसण्याची वेळ दिल्लीकरांवर आली नसती.

७०५८५८९७६७
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.