ठाणे : मुंबई विद्यापीठाच्या झोन दोनच्या आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय पुरुष गटात विजेता ठरला आहे. तर महिलांच्या गटात एन. खंडवाला महाविद्यालयाने विजेतेपदक पटकावले. झुनझुनवाला महाविद्यालयाच्या खेळाडुंना प्रशिक्षक मारीसेल्व पंडीधर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, पालघर मधील सेंट जॉन कॉलेज ऑफ टेक्निकल अँड एज्युकेशनल कॅम्पसमध्ये २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुषांचे ३५ संघ व महिलांचे १७ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन विश्वस्त अल्ड्रिज डिसूजा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय सचिव आदित्य कुलकर्णी, धनंजय वनमाळी, सतीश शिवरकर,अंकित गोठी आदी उपस्थित होते.
पुरुष गटात झालेल्या अंतिम सामन्यात झुनझुनवाला महाविद्यालयाने ठाकूर महाविद्यालयाचा २५ - २२ ; २५ - १८ आणि २५ -१६ असा सलग तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. विजेत्या संघाला चषक व खेळाडुंना वैयक्तिक मेडल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.
तत्पूर्वी ब गटात उपांत्यफेरीच्या लढतीत झुनझुनवाला महाविद्यालयाने एन. खंडवाला संघावर लिलया मात केली. दरम्यान, गतवर्षीही विजेते पद पटकावल्या नंतर यंदादेखील झुनझुनवाला महाविद्यालयाने विजयी परंपरा कायम राखल्याने झुनझुनवाला संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.