मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेले नेत्रदीपक यश हा या राज्यातील जनतेने या लोककल्याणकारी सरकारवर पुन्हा एकदा दाखविलेल्या विश्वासाचा मूर्तिमंत पुरावा आहे.या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करीत क्रमांक १ चे स्थान पटकाविले. या यशाचे संपूर्ण श्रेय भाजपाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे भाजपा केवळ गावागावात नाही तर घराघरात पोहोचला आहे, ही बाब आजच्या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे खंबीर पाठबळ, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे कुशल नेतृत्व आणि आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाची ही विजयी घोडदौड निरंतर सुरू आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनता महायुतीच्या पाठीशी राहील आणि ४५ हून अधिक खासदार निवडून येतील ही खात्री आहे, असे ही ते यावेळी म्हणाले.
आजचा विजय आनंदाचा आणि जल्लोषाचा असला तरी या निकालाने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरील जबाबदारी आणखी वाढली आहे. लोककल्याण आणि जनसेवेचे व्रत यापुढेही अखंडपणे सुरू राहील, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला.