लक्ष लक्ष दिव्यांनी जीवनाला सर्वार्थाने प्रकाशमान करणारा दीपोत्सव...सारा आसमंत झगमगटाने, दिव्यांच्या रोषणाईने दिवाळीत उजळून निघेल. पण, केवळ बाह्यजीवनातील या दीपोत्सवाच्या लखलखटाने दिपून न जाता, या दीपोत्सवाच्या निमित्ताने अंतर्मनातही आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित करायला हवी. चला तर मग यंदाच्या दिवाळीत आयुष्याच्या नागमोडी वळणावर गतिरोधक ठरणार्या अशाच काही प्रलोभनांचा अंध:कार दूर लोटूया...
मानसशास्त्रात असे दिसून आले आहे की, लोक नियमितपणे दिवसभर काही ना काही इच्छा व्यक्त करत असतात. यापैकी काही इच्छा आपल्यासाठी तशा वाईट नसतात. किंबहुना, जगण्यासाठी त्या गरजेच्याही असतात. भूक लागल्यावर जेवायचे, मरगळ जाणवली की कॉफी प्यायची किंवा कंटाळा आला की मित्राला कॉल करायचा... या सर्व मनीषा आपल्यासाठी समाधान देणार्या असू शकतात. परंतु, इतर प्रकारच्या विघातक इच्छेनुसार वागणे आपल्याला अडचणीत आणू शकते. एखाद्याचा खूप संताप आला, राग अगदी अनावर झाला, म्हणून त्याला ठार मारून टाकायची इच्छा किंवा आवेगाने मनात आलेली लैंगिक इच्छा यांसारखी घातक प्रलोभने. मग लोकं या विक्षिप्त आणि हिंसक मोहांवर नेमकी कशी मात करतात? लोकं या वासनांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांचे बरेच आयुष्य खर्ची घालतात. ते फक्त अशा प्रलोभनांना ठामपणे ‘नाही’ म्हणतात किंवा त्यांची प्रबळ इच्छाशक्ती वापरतात. मग अशा या प्रलोभनांचा प्रतिकार करण्यासाठी काही विशेष उपयुक्त अशी धोरणे आहेत का? तर त्याचे उत्तर हो, अशी धोरणे आहेत आणि अशा प्रकारच्या प्रयत्नांना ‘आत्म-नियंत्रण’ असे म्हणतात.
अशा इच्छा ज्याचा तुम्ही यापूर्वी मनापासून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता, त्या इच्छा पूर्ण करण्याची जेव्हा जेव्हा सहज सुलभ संधी मिळते, तेव्हा लोक त्या निक्षून पूर्ण करतात. त्या प्रलोभनांचा पूर्वी प्रतिकार करण्याचा संकल्प करूनही, संधी मिळताच त्या क्षणी ५० टक्क्यांपेक्षा जास्त वेळा लोक त्या क्षणाला बळी पडतात किंवा हार मानतात. काही लोकांना मात्र या इच्छांना शरण जायची गरजच पडत नाही. कारण, ते त्यांच्या आसपासचे वातावरण अशा प्रकारे तयार करतात की, या प्रलोभनांना स्वीकारणे त्यांना अशक्यप्राय होते. ही एक अतिशय प्रभावी रणनीती ठरु शकते. उदा. जर तुम्हाला चॉकलेट खायचे नसेल, तर ते तुमच्या पर्समध्ये ठेवूच नका. जर तुम्हाला मद्यपान करायचे नसेल, तर मद्याची बाटली जवळपास ठेवू नका. जर तुम्ही अभ्यास करत असाल किंवा तुमच्या लहान मुलांचा अभ्यास घेत असाल, तर तुमचा मोबाईल फोन बंद ठेवा किंवा घराच्या वेगळ्या भागात ठेवा. म्हणजे मजकूर संदेश आणि ट्विटरद्वारे विचलित होण्याचा प्रश्नच येणार नाही.
पण, जेव्हा लोकांना त्यांची इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळते तेव्हा त्याचे काय करायचे? अशा प्रकरणांमध्ये, एका अभ्यासात असे आढळले की, ज्यांनी कोणतीही एक रणनीती वापरायची ठरविले, तेव्हा या प्रलोभनांचा त्यांना यशस्वीपणे प्रतिकार करण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा लोकांनी त्यांच्या प्रलोभनांचा यशस्वी प्रतिकार केला, तेव्हा त्यांनी त्यासाठी वापरलेल्या धोरणांबद्दल त्यांना प्रश्न विचारले गेले. तेव्हा या प्रलोभनांच्या प्रतिकारासाठी त्यांनी काही पर्याय वापरल्याचे दिसून आले. त्यांच्यापैकी काहींनी स्वतःला त्या परिस्थितीपासून दूर केले, तर काहींनी त्यांचे लक्ष विचलित केले. काहींनी त्यांच्या भविष्यातील ध्येयांची स्वतःला आठवण करून दिली, काहींनी स्वतःला वचन दिले की, ते नंतर कदाचित शरण जातील, सध्या तरी नक्की नाही. काहींनी ते प्रलोभन त्यांच्यासाठी वाईट का होते, याची स्वतःला आठवण करून दिली.
काहींनी स्वतःची फक्त इच्छाशक्ती वापरली/फक्त आत्मविश्वासाने प्रतिकार केला. यातून असे लक्षात येते की, सर्वांत उपयुक्त गोष्ट म्हणजे अशा धोरणांची किंवा पर्यायांची स्वतःची अशी साधनपेटी किंवा टूलबॉक्स असणे फायदेशीर ठरु शकते. एकाच प्रकारची रणनीती सगळ्या परिस्थितीत चालेल, असेही नाही. परंतु, हे प्रत्येक व्यक्तीनुसार आणि परिस्थितीनुसार भिन्न असू शकेल. तुमच्या बटव्यात काही भिन्न धोरणे असणे आणि त्यापैकी काही एकाच वेळी वापरणे व्यवहारिक ठरू शकते. सर्व रणनीती सारख्याच प्रभावी ठरतील, असे अजिबात नाही. पण, कोणतीही रणनीती न वापरण्यापेक्षा एखादी तरी वापरून विचार करून वापरल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. तथापि, काही विशिष्ट ठिकाणी एकापरीस अधिक पर्याय वापरणे अधिक उचित ठरेल. वापरलेल्या प्रत्येक अतिरिक्त रणनीतीसाठी, लोकांच्या प्रलोभनांचा यशस्वीपणे प्रतिकार करण्याची शक्यता दोन-तीन पट जास्त असू शकते!
दारू, जुगार यांसारख्या प्रलोभनांतून मुक्त राहावयाचे काम सामान्य माणसासाठी खूप कठीण आहे, हे संशोधनातूनही सिद्ध झाले आहे. पण, उत्तम प्रतीचे मित्रमंडळ किंवा विश्वासू मित्रांसह तुमचे मोठे विघातक प्रलोभन सामायिक करा. जेव्हा तुमचा मोह तुमच्या नावाने जल्लोष करत असतो, तेव्हा हे परिणत मित्र तुम्हाला योग्य मार्गाची निवड करण्यासाठी मदत करतात.
लक्षात ठेवा एकापेक्षा दोघांची इच्छाशक्ती आणि सामर्थ्य श्रेष्ठ आहे! सर्वसाधारणपणे जे प्रलोभनांवर मात करतात आणि योग्य ते करण्यास झटतात, अशा लोकांचे आपण अनुकरण करतो. त्यांच्यात आपल्याला अचाट इच्छा शक्ती दिसते, जी आपण आपल्यात प्रोत्साहित करू इच्छितो. मोहाचा प्रतिकार करण्याचा किंवा विलंब करण्याचा प्रयत्न करताना तीन सोप्या युक्त्या प्रत्येकाकडे आहेत. त्या वेळोवेळी वापरा. थोडे थांबा आणि विचार करा. आपले भविष्यातील ध्येय जाणून घ्या आणि प्रलोभनची जोखीम ओळखा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक राहा!