नवी दिल्ली : इस्त्रायल-हमास युद्ध सुरु असताना एअर इंडियाने तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणे दि.३० नोव्हेंबरपर्यत स्थगित केली आहेत. एअरलाईनच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. एअर इंडियाची तेल अवीवला आठवड्यातून पाच दिवस फ्लाइट्स असते. पण इस्त्रायल-हमास यांच्यात गेल्या एक महिन्यापासून संघर्ष सुरु आहे. त्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन अजय अंतर्गत काही भारतीयांसाठी तेल अवीवला विशेष चार्टर्ड फ्लाइट्सची सोय केली होती.
गाझा पट्टीमध्ये असलेल्या निर्वासितांच्या शिबिरावर इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यात ४० लोक ठार झाले आहेत. शनिवार-रविवारच्या रात्री छावणीतील बहुतांश निर्वासित झोपलेले असताना हा हल्ला झाला. आणखी एका हल्ल्यात गाझामध्ये एकाच कुटुंबातील २१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. संवेदनशील ठिकाणांवर इस्रायली लष्कराच्या हल्ल्यांमुळे हैराण झालेल्या अरब देशांनी गाझामध्ये पुन्हा एकदा युद्धबंदीची मागणी केली आहे. पण, इस्रायल आणि अमेरिकेने ही मागणी फेटाळून लावली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन हे अचानक वेस्ट बँकला पोहोचले असून त्यांनी पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांना युद्धानंतर गाझामध्ये मध्यवर्ती भूमिका बजावण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यूच्या वाढत्या संख्येच्या निषेधार्थ रविवारी जगातील अनेक देशांमध्ये इस्रायलविरोधात निदर्शने करण्यात आली. दरम्यान, इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझावर अण्वस्त्र हल्ल्याचा पर्याय खुला असल्याचे सांगून त्यांच्या एका मंत्र्याला मंत्रिमंडळातून निलंबित केले आहे.
तसेच गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यांमुळे मृतांची संख्या दहा हजारांच्या जवळ पोहोचली आहे. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. इस्रायली लष्कर हमास या अतिरेकी संघटनेच्या प्रभावाखाली असलेल्या गाझा पट्टी भागात जमीन, आकाश आणि समुद्रातून हल्ले करत आहे. गाझा आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, इस्रायली विमानांनी काल रात्री मध्यवर्ती भागातील मेघाजी निर्वासित शिबिरातील घरांवर बॉम्बफेक केली, ज्यात ४० लोक ठार झाल्याची माहिती आहे. ढिगाऱ्याखाली अजून काही लोक गाडले गेल्याची शक्यता आहे.
मुहम्मद अल-अलोल या तुर्कस्तानच्या वृत्तसंस्थेसाठी काम करणाऱ्या छायाचित्रकाराच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या हल्ल्यात त्यांची चार मुले, चार भाऊ आणि त्यांची मुले गमावली. तर, इस्रायलने म्हटले आहे की ते हमासच्या सैनिकांना आणि त्यांच्या संसाधनांना लक्ष्य करत आहेत परंतु हमास नागरिकांचा ढाल म्हणून वापर करत असल्याने, ते हल्ल्यात मरत आहेत. दरम्यान, इस्रायलच्या ताब्यातील वेस्ट बॅंकेतही इस्रायली सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. लेबनॉनच्या सीमेवर इस्त्रायली फौजा हिजबुल्लाहच्या लढवय्यांशीही लढत आहेत. इस्त्रायली लष्करही लेबनॉनमध्ये हवाई हल्ले करत आहे.
अनेक शहरांमध्ये इस्रायलविरोधी निदर्शने
दरम्यान, इस्रायलचा विरोध कमी करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन सोमवारी तुर्कस्तानला भेट देणार आहेत. तर रविवारी गाझामध्ये युद्धबंदीच्या मागणीसाठी लंडन, बर्लिन, पॅरिस, इस्तंबूल, जकार्तासह अनेक शहरांमध्ये इस्रायलविरोधी निदर्शने करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्या युद्ध धोरणावर टीका करण्यासाठी आणि गाझामध्ये युद्धबंदीची मागणी करण्यासाठी हजारो लोक वॉशिंग्टनमध्ये जमले.