विक्रमादित्याला गाठणार विराट विजय

    05-Nov-2023
Total Views |
India Won By 243 Runs Agianst South Africa

कोलकाता :
भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीने ४९ वे शतक झळकवत विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याचबरोबर भारताने आजच्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेवर तब्बल २४३ धावांनी विजय मिळवत सलग ८वा विजय साजरा केला.

कोलकात्यातील इडन गार्डनवर रविवारी खेळविल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बर्थ डे बॉय विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर ५० षटकांत ५ गडी गमावून ३२६ धावांचा डोंगर उभा केला. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेला पेलविले नाही. आफ्रिकेच्या संघाने २७.१ षटकात सर्व गडी गमावून अवघ्या ८३ धावा केल्या. रवींद्र जडेजाने ५ बळी घेतले, तर मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ आणि सिराजने १ बळी टिपला.

विराटने सचिनला गाठले

विराट कोहलीने आपल्या वाढदिवशी शतकी खेळी करून अवघ्या क्रिकेट रसिकांना रिटन गिफ्ट दिले. त्याने आपले १२१ चेंडूत १०१ धावा करून आपले ४९ वे शतक साजरे करत वनडेतील सर्वाधिक शतकांच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. कोहली आपल्या वाढदिवशी विश्वचषकात शतक झळकावणारा भारताचा पहिला आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला.


सचिनकडून विराटचे कौतुक

आपल्या विक्रमाशी बरोबरी केल्यानंतर सचिनने एक्सवर पोस्ट करून विराटचे अभिनंदन केले. विराट चांगला खेळला. मला ४९व्या शतकावरून ५०व्या शतकापर्यंत पोहोचायला ३६५ दिवस लागले. मला आशा आहे की तू काही दिवसांत ५० शतके ठोकशील आणि माझा विक्रम मोडशील, अशा शुभेच्छा दिल्या.