नवी दिल्ली : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकाचा सामना खेळविण्यात येत आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. किवींनी प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांना दिवसाढवळ्या तारे दाखवले आहेत. न्यूझीलंडचा युवा डावखुरा फलंदाज रचिन रवींद्र याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर बाबरसेनेला सळो क पळो करून सोडले. पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीला विकेट्ससाठी मेटाकुटीला आल्याचे पाहायला मिळाले.
रचिन रवींद्रने ९४ चेंडूत १५ चौकार आणि १ षटकारासह १०८ धावांची शतकी खेळी केली. यामुळे किवींचा संघ ४०० धावांचा डोंगर उभा करू शकला. त्यामुळे, भारताने आयसीसी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असताना पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. भारतीय वंशाच्या रवींद्रने या स्पर्धेत आतापर्यंत ५२३ धावा केल्या आहेत आणि कोणत्याही विश्वचषकात २५ वर्षांखालील खेळाडूसाठी ही सर्वाधिक धावासंख्या ठरली आहे.