महुआ,अब बहुत हुआ!

    04-Nov-2023   
Total Views |
Article on TMC MP Mahua Moitra

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असबद्ध टीका करून पोट भरणार्‍या टोळीतील एक फाटक्या तोंड्याची तृणमूल काँग्रेसची खासदार म्हणजे महुआ मोईत्रा. ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणाने पुनश्च चर्चेत आलेल्या महुआ मोईत्राच्या उतरत्या अनीतिपूर्ण कारकिर्दीचा त्यानिमित्ताने मागोवा घेणारा हा लेख...

"त्याने माझ्या जन्मदिनी केवळ एक ‘हर्मीस’चा स्कार्फ दिला. मी त्याला ’बेबी ब्राऊन मेकअप’ सेटबद्दल विचारले, तर त्याने मला ‘मैक आय शॅडो’ आणि ’बिट पीच लिपस्टिक’ दिली. जेव्हा कधी मी मुंबई किंवा दुबईला असायचे, तेव्हा त्याची गाडी मला विमानतळावर घ्यायला यायची आणि सोडायचीही.” आता ही विधानं ऐकून काय वाटले? कुणीतरी महाविद्यालयीन कन्या किंवा अशीच अजाण षोडषा युवती असावी. ती मेकअप सेट वगैरे तिच्या अती अती जवळच्या हक्काच्या व्यक्तीकडे मागत असावी. हो ना? पण थांबा, ही अजाण षोडषा किंवा महाविद्यालयीन युवती नाही, तर ती आहे, तृणमूल काँग्रेस पक्षाची कृष्णानगर लोकसभा मतदारसंघाची खासदार महुआ मोईत्रा. महुआने बॉबी ब्राऊन मेकअप सेट मागितले असता, तिला केवळ ’मॅक आय शॅडो’ आणि ’बिट पीच लिपस्टिक’ देऊन तिची बोळवण करणारा, कोण तर हिरानंदानी ग्रुपचा सीईओ दर्शन हिरानंदानी! महुआ जरी केवळ स्कार्फ आणि आय शॅडो आणि लिपस्टिक भेट दिली, म्हणून सांगत असली तरीसुद्धा समाजमाध्यमांमध्ये तिला भेटवस्तू म्हणून काय काय मिळाले, याची यादीच जाहीर झाली आहे. त्यानुसार १ लाख, ३९ हजार, ९९० रुपये किमतीचा ‘आयफोन’ तसेच ‘हेर्मस’ कंपनीचा ४२ हजार, ४५९ रुपयांचा आणि ‘लुईस व्यटॉन’चे स्कार्फ ज्यांची किंमत ५० हजार रुपयांपासून ते ४.९५ लाख रुपये आहे. तसेच ’सॅलव्हेटर फेरगॅम’च्या ३५ जोड्या पादत्राणे, ज्यांची किंमत अंदाजे ७० हजार रुपयांपासून १.१० लाख रुपयापर्यंत आहे. तसेच फ्रान्स आणि इटलीची वाईनही भेट मिळाली, जिची किंमत प्रतिबॉटल पाच हजार ते ५० हजार रुपये आहे. इतकेच नाही तर प्रीमियम कंपनीची ‘गुसी’ची दोन लाख रुपये किमतीची बॅग आणि मगरीच्या चामड्यापसून बनवलेली बॅगही!

कोण आहे, ही महुआ मोईत्रा? महुआ ही द्वीपेंद्र लाल मोईत्रा आणि मंजू मोईत्रा या आसामी दाम्पत्याची मुलगी. तिचे शालेय शिक्षण आसाम आणि कोलकातामध्ये झाले. नंतर उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेला गेली. तिथे मॅसाच्युसेट्स येथीलमाऊंट होलियोक कॉलेजमधून गणित आणि अर्थशास्त्राची पदवी तिने घेतली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिका आणि युके येथे ‘बँकर’ म्हणून नोकरीही केली. तसेच लंडन येथे ‘जेपी मॉर्गन’ मध्येही ‘बँकर’ची नोकरी केली. २००२ साली तिने डेन्मार्कच्या लार्स ब्रोरसन याच्याशी विवाह केला आणि काही कालावधीतच तिने घटस्फोटही घेतला. या सगळ्या घडामोडींत तिला साक्षात्कार झाला की, आपण राजकारणात जायला हवे. भारतात परतून सत्ताधारी व्हायला हवे. त्यामुळे मग ती २००८ साली भारतात परतली आणि २००९ साली ती काँग्रेसमध्ये सामील झाली. कारण, तेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत होता. त्यावेळी ती राहुल गांधी यांची अत्यंत विश्वासू सहकारी होती. त्याचवेळी प. बंगालमधली राजकीय समीकरणं मात्र बदलत होती. काँग्रेसपेक्षा आणि कम्युनिस्टांपेक्षाही तृणमूलचे पारडे जड आहे, हे पाहून महुआ २०१० साली तृणमूल पक्षात गेली. तिने २०१६ साली तृणमूल पक्षाकडून करीमपूर विधानसभेचे तिकीट मिळवले. पुढे २०१९ साली कृष्णानगरमधून खासदारकीही मिळवली. सध्या ती तृणमूलची अधिवक्ता आहेच, तर अशा या खासदार महुआ मोईत्राचे नाव सध्या ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात अत्यंत वाईट पद्धतीने चर्चेत आहे. संसदेमध्ये अदानी समूहाबद्दल प्रश्न विचारण्यासाठी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून तिने पैसे आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या, असा तिच्यावर आरोप. आरोप पण कोणी करावा, तर महुआ यांचा माजी सोबती अ‍ॅड. जय अनंत देहद्राई यांनी.

आनंद यांनी तसे पत्र लोकसभा अध्यक्षांना लिहिले. त्यामुळे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआवर तत्काळ कार्यवाही व्हावी, अशी लोकसभा अध्यक्षांकडे मागणी केली. दुसरीकडे दर्शन हिरानंदानी यांनी मान्य केले की, अदानी समूहाबद्दल प्रश्न विचारावेत, यासाठी ते महुआला पैसे आणि महागड्या भेट वस्तू द्यायचे. तसेच दर्शनने असेही सांगितले की, ”मोईत्राला देशभर लवकर प्रसिद्ध व्हायचे होते. तिच्या सल्लागारांनी तिला सांगितले की, राजकारणात झटपट नाव कमवायचे असेल तर मोदींसंदर्भात टीकाटिप्पणी करायला पाहिजे. त्यासाठी तिने अदानी ग्रुपला निवडले. अदानी ग्रुपचे नाव घेऊन त्यात मोदींचे नाव घ्यायचे, असा तिने प्लॅन केला. अदानी ग्रुपबद्दल माहिती मिळवण्यासाठी, तिने माझी मदत मागितली, तिने मला तिचा लोकसभा संकेतस्थळावरील आयडी आणि पासवर्डही दिला की, जेणेकरून अदानी समूहाबद्दलचे प्रश्न मीच त्या ई-मेलवर टाकू शकेन.” महुआने तिच्या लोकसभेचा आयडी आणि पासवर्ड दर्शन हिरानंदानी यांना दिला होता आणि महुआ भारतात संसदेमध्ये असताना, अनेकवेळा दुबईहून तिचे अकाऊंट चालवले गेले. यामुळेच तर या प्रकरणाचे आणखी तापले. कारण, खा. महुआचे अकाऊंट ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’वर आहे. त्यावर पूर्णपणे भारत सरकारचे नियंत्रण आहे. देशाचे पंतप्रधान, वित्त विभाग, केंद्रीय एजन्सीसुद्धा आहे. हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, तर या सगळ्या प्रकरणातून महुआ मोईत्रा आणि तृणमूल काँग्रेसच्य नीतिमत्तेचे पार तीनतेरा वाजले आहेत. सत्तालोलुपता, सत्तास्वार्थ यासाठी एखाद्या लोकप्रतिनिधीने इतके हीन पातळीचे काम करावे?

तिच्यावरील आरोपांसंदर्भात लोकसभेच्या एथिक्स कमिटीने तिची चौकशी सुरू केली आहे. दि. २ नोव्हेंबर रोजी तिची चौकशी सुरू होती. या चौकशीवरूनही महुआने वेगळाच राग आलापायला सुरुवात केली आहे. समितीने माझे शाब्दिक वस्त्रहरण केले वगैरे म्हणत, तिने ’सुनो द्रौपदी’ वगैरे कविता सोशल मीडियावर पोस्ट केली. तिने आरोप केले की, समितीच्या अध्यक्षांनी आणि काही सदस्यांनी तिला अत्यंत अशोभनीय अनैतिक आणि पूर्वग्रहदूषित प्रश्न विचारले. तिच्या सोबत असलेल्या बसपचे खासदार दानिश अली याने म्हटले की, समितीच्या अध्यक्षांनी विचारले की, महुआ रात्री कुणाशी बोलते? तर त्या चौकशीमध्ये सहभागी असलेले या प्रकरणातले साक्षीदार खा. निशिकांत दुबे म्हणाले की, ”संसदेच्या एथिक्स कमिटीच्या कामाचीही संसदीय कामासारखी नोंद केली जाते. महुआ यांना कोणतेही अनैतिक प्रश्न विचारले गेले नाही, हे त्या नोंदीवरूनच समजेल. जर त्यात सिद्ध झाले की, महुआला वैयक्तिक जीवनासंदर्भात अनैतिक प्रश्न विचारले असतील, तर मी राजीनामा देईन.” यावर बसपचे दानिश अली आणि कम्युनिस्ट पक्ष तसेच काँग्रेसच्या काही खासदारांना वगळून बाकी सगळ्यांचेच म्हणणे आहे की, ’सहानुभूती मिळवण्यासाठी महुआ महिलाकार्ड खेळत आहे.’

साडी नेसणारी, कपाळाला टिकली लावणारी आणि एकंदर भारतीय स्त्रियांसारखी वेशभूषा करणार्‍या महुआला भारतीय संस्कार आणि प्रतीकांचा किती तिटकारा असावा? तर नुकतेच ’चांद्रयान-३’ चंद्रावर जिथे लॅण्ड झाले, त्या पॉईंटला पंतप्रधान मोदी आणि रचनेने ‘शिवशक्ती पॉईंट’ हे नाव दिले. यावर महुआ खूप संतापली. तिचे म्हणणे की, व्रिकम लॅण्डर तिथे उतरले होते, मग ‘शिवशक्ती’ नाव का दिले? महुआच्या या प्रश्नामागे काय होते? तर भारतीय धर्मसंस्कृतीचे नाव चंद्राच्या कोणत्याही ठिकाणी नको. पुढे ती म्हणाली होती की, ”भविष्यात अदानी तिथे घर बांधेल आणि मग तिथे गैरहिंदूंना आणि मांसाहारी लोकांना राहायला देणार नाही.” काय म्हणावे या अजब तर्काला? पण, ममतांच्या तृणमूलचा जो सध्याचा मतदार आहे, त्याला खुश करण्यासाठी महुआला हे बोलणे भागच होते. “कालिमाता दारू पिणारी आणि मांस खाणारी आहे,” असे म्हणणारी तसेच ब्राह्मण पत्रकाराला चक्क ‘शेंडीवाला राक्षस’ म्हणणारी संसदेमध्ये दुसर्‍या खासदाराला ऑन रेकॉर्ड ‘ह*मी’ म्हणणारी आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी फाटलेल्या जिन्स घालणार्‍या मुलींना पालकत्वाचा सल्ला दिला, तेव्हा ‘मुख्यमंत्र्याचा मेंदू फाटलेला आहे,’ अशा अभद्र टीप्प्ण्या करणारी महुआ मोईत्रा. भाजप आणि हिंदू म्हणजे गोमूत्र पिणारे, असे तिचे म्हणणे! राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्याआधी तिने म्हटले होते की, ”भाजपवाल्यांनो, मी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार आहे.

तुम्ही गोमूत्राचे शॉट्स पिऊन तयार राहा.” यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, ’महुआ शॉट्स बिट्स म्हणणार; कारण मागे महुआचे फोटो व्हायरल झाले होते. अत्यंत तोकडे आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून त्यात, ती बसली आहे. सिगार ओढत मद्याचा प्याला हातात घेऊन, शशी थरूर यांना चिअर्सही करत आहे. त्यामुळे मद्य पिण्याचे शॉट्स असतात, तसे गोमूत्राचेही शॉट्स असावेत, असा तिचा समज असावा.’ महुआने तिच्या या वागण्याचे समर्थन करत म्हटले की, ”बंगालच्या महिला जीवन जगतात, दुःख नाही.” काय म्हणावे? बंगाली संस्कृती रसिकता आणि संस्कारांचा समन्वय साधणारी. साहित्य, उमेद आणि चैतन्य यांसोबतच नीती आणि कर्तव्याचाही अंतर्भाव या संस्कृतीमध्ये आहे. पण, आपल्याकडे जसे काही राजकीय लोक ’आम्ही म्हणजे महाराष्ट्र, आम्ही म्हणजे मराठी लोक’ म्हणून वाट्टेल ते करायचे, तसेच महुआनेही तिच्या दारू पिण्याचा, सिगार ओढण्याचा आणि शशी थरूरसोबत तोकड्या कपड्यात जीवाची चैन करण्याचा संबंध बंगाली महिलांशी लावला. प्रांतवादाच्या अस्मितेला फुंकर घातली की, लोक आपले समर्थन करतील, असे महुआला वाटते. आपण मोठे कालिभक्त आहोत, असे सदा न् कदा म्हणणार्‍या महुआने प. बंगालमध्ये मुलींवर होणार्‍या अत्याचाराबद्दल कधीही चकार शब्द उच्चारला नाही. इतकेच काय तर मोहरमच्या दिवशी देवीची मिरवणूक काढायची नाही, म्हणत ममताने मागे फतवा काढला, तेव्हा महुआ कुठे होती?

या सगळ्या प्रकरणात महुआबरोबरच ममता बॅनर्जींच्या भ्रष्ट राजकारणाचे पितळ उघडे पडले आहे. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसने सोयीने ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात मौन पाळले. कृष्णनगरची खासदार असलेली महुआ कृष्णनगरच्या प्रश्नाबद्दल संसदेमध्ये बोलत नाही. सगळे प्रश्न अदानी समूहावरचे आणि सगळे बोलणे मोदींविरोधातले तर्कहीन. महुआ कृष्णनगरसाठी वेळ न देता उठसूठ मुंबई आणि दुबईला का जाते, हा प्रश्न तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना प्रश्न पडला नाही? महुआ ज्या लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करते, ते कृष्णनगर म्हणजे कम्युनिस्टांचा अड्डा आणि नक्षली समर्थकांचे माहेर. गोरगरिबांचे आपणच ते काय कैवारी असे म्हणणारे, कम्युनिस्ट आणि नक्षली समर्थकही. परदेशातून शिकून कोट्यवधी रुपयांची नोकरी करणारी आणि लाखोंच्या पर्स आणि चपला वापरणारी महुआ. आपले शौक खर्च भागवण्यासाठी संसदेत प्रश्न विचाारण्यासाठी पैसे घेणारी भेटवस्त्ाू घेणार्‍या, महुआचे समर्थन कम्युनिस्ट आणि काँग्रेसींनी केले आहे. तिच्या देव-देश-धर्म संस्कृती विरोधातल्या वागण्या-बोलण्यामागे आणि सोबत कोण आहे, हे यातूनच स्पष्ट होते. सध्या तरी महुआ हिमनगाचे टोक आहे. या हिमनगाच्या टोकाला सत्तामय ’ममता’ देणारेही लवकरच जनतेसमोर उघडे पडतील, हे नक्की. थोडक्यात, काय तर महुआचे ममतामय सत्ताकारण!

९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.