सागराशी मैत्री करुन देणारा 'सागर महोत्सव'

    30-Nov-2023
Total Views |



Sagar Mohotsav 2024



मुंबई(विशेष प्रतिनिधी): सागरी जैवविविधतेबाबत सामान्यांमध्ये सजगता निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातुन भरविण्यात येणारा सागर महोत्सव दि. ११ ते १४ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. दै. मुंबई तरुण भारतच्या माध्यम सहाय्याने आयोजित या महोत्सवामध्ये विविध तज्ञांची मार्गदर्शन सत्रे, मुंबई तरुण भारतचे वेब पोर्टल महाएमटीबीने बनविलेल्या चित्रफितींचे प्रदर्शन तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात हा महोत्सव पार पडणार आहे. 


गुरुवार दि. ११ जानेवारी ते रविवार दि. १४ जानेवारी असे चार दिवस हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता या सागर महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर भारतीय नौदलाचे निवृत्त कोमोडोर जोगळेकर आणि नॅश्नल इन्स्टीट्यूट ऑफ ओशनोलॉजीचे संचालक डॉ. सिंघ हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी ११:१५ ते १२ या वेळेत महासागराचे अध्यात्मिक दर्शन या विषयावर श्रीनिवास पेंडसे यांचे प्रवचन होणार आहे. दुपारी १२ ते १ दरम्यान पहिले मार्गदर्शन सत्र कोस्टल अँड मरीन हॅबिटॅट या विषयावर डॉ. कार्लेकर घेणार आहेत व त्यानंतर निवृत्त कमांडर आपटे यांचे हायड्रोग्राफिक्स या विषयावर मार्गदर्शन सत्र दुपारी २ ते ३ या वेळेत होईल. यानंतर महाएमटीबीच्या चित्रफितींचे प्रदर्शन होणार असून त्यानंतर पुन्हा संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत सागरी गुहांवर संशोधक धनुषा कवाळकर मार्गदर्शन करणार आहेत.


महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ते ८:३० या वेळेमध्ये सागरसखा प्रदिप पाताडे आणि डॉ. अमृता भावे यांच्याबरोबर समुद्र किनाऱ्याची सफर (Shore walk) आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सकाळी ९:३० ते १०:३० या वेळेत कांदळवनांच्या गुजगोष्टी या विषयावर डॉ. धारगळकर यांचे मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. यानंतर सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत सागरी सस्तन प्राणी (Marine Mammals) या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. वाईल्डलाइफ कॉन्झरवेशन सोसायटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत हे सत्र दिले जाणार आहे. आसमंत कोस्टल मॅपिंग प्रोजेक्ट या विषयावर डॉ. अंडगे मार्गदर्शन करणार असून त्यानंतर नॅश्नल इनोव्हेशन फाऊंडेशनच्या कार्याबद्दल माहिती दिली जाणार आहे. संध्याकाळी पुन्हा भाट्ये आणि कुर्ले किनाऱ्याच्या सफरीने दुसरा दिवस संपेल.


शनिवार दि. १३ जानेवारी रोजी सागरी सफरीने (Shore walk) सुरुवात झाल्यानंतर नॅश्नल इन्स्टीट्यूट ऑफ ओशनोलॉजीचे डॉ. डामरे यांचे सत्र आयोजित केले आहे. तर, डॉ. नांदस्कर यांचे प्रवाळांवर सत्र आयोजित केले आहे. त्यानंतर दुपारी २ ते ३ या वेळेत महोत्सवातील शेवटचे म्हणजेच दहावे सत्र फिशींग टेक्नॉलॉजीज या विषयावर रत्नागिरी फिशरीज कॉलेजचे डॉ. मुळे मार्गदर्शल करतील. त्यानंतर या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणारे सी-बोटचे प्रक्षेपण नॅश्नल इन्स्टीट्यूट ऑफ ओशनोलॉजी या संस्थेच्या पुढाकाराने उपस्थितांना पाहता येणार आहे. सागर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवार दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ७:३० ते १० आणि १०:३० ते १ या वेळेत दोन टप्प्यांमध्ये कांदळवन अभ्यास दौरा आयोजित केला जाणार असून त्यामध्ये डॉ. विनोद धारगळकर आणि गोदरेज कांदळवनांचे  हेमंत कारखानीस कांदळवनांविषयी मार्गदर्शन करणार आहेत. कांदळवने, सागरी सस्तन प्राणी, समुद्री गुहा अशी सागर परिसंस्थेविषयी माहिती आणि प्रत्यक्ष समुद्राशी जवळुन ओळख करुन देणारा हा महोत्सव नक्कीच सागर प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.