बोरकरांची लख्ख आरस्पानी कविता

    30-Nov-2023   
Total Views |

borkar
 
मंद मंद वाजत आयली तुझी गो पैंजणा
मैत्रिणीची, यौवनाची, पत्नीची सुखाची चाहूल अशी रुणझुणत येते, मग ती बांगड्यांची किणकिण असो, पैंजणांचा आवाज असो, ही चाहूल आणि त्यानिमित्ताने आपल्या मनातली हुरहूर निखळपणे मांडू शकणाऱ्या काही ठराविक नावात बोरकरांचे नाव घेता येतं. जन्म गोव्यातला. समुद्र, सौंदर्य याच वरदानच ज्या भूमीला मिळाली तिथला बोरकरांच्या जन्म. पण हाच त्यांच्या कवितेचा फॉर्म आहे असे म्हणता येत नाही.. त्यांनी स्वतःचं आयुष्य विस्कटून त्यातून तयार होणाऱ्या सगळ्या रंगरूपांना आपल्या कवितेत जागा दिली. तो त्यांचा प्रवास मला आज सांगायचाय.. ही नवथर कोवळी वयं सरल्यावर येते ती जबाबदारीची जाणीव, लग्न. सहवास, त्यातून प्रेम आणि त्यातूनच पुढे जोडीदारावर असलेलं भावनिक अवलंबित्व.
 
ते म्हणतात..
तू गेल्यावर फिके चांदणे,
घरपसरुही सुने सुके,
मुले मांजरापरी मुकी अन
दर दोघांच्या मध्ये धुके..
तू गेल्यावर कसे अचानक,
घरात पाऊल अडखळते,
श्वासास्तव मन तडफडते
तू गेल्यावर...
 
एकदा का नऊ दिवसांची नव्हाळी विरून गेली की सुरु होते ती सुख दुःखांची लपाछपी. कवी कसा बघा, दुखालाही वाईट ठरवत नाही. दुःखाची किनारच सुखाला कसं पूर्ण करते हेच सांगतो तो. तीच गमक कळतं आणि त्याला आयुष्य वळत जातं.
कोण ही व्यथा अशी सुखास लाज आणते,
सागरार्थ कोणत्या उसासूनी उधाणते
 
गोव्यातला जन्म म्हंटल्यावर समुद्राशी घनिष्ट परिचय आलाच. त्याचा भरती-सर्तीशी आपल्या सुखदुःखांशी नाळ बांधली गेलीच असते. सतत दिवसरात्र जी गाज ऐकू येत असते तिची आपल्या हृदयाच्या ठोक्यांसारखी सवय होऊन जाते. पण गावाबाहेरच जग पारख नाही होतं कावीळ.कधिकचक. रामदासांच्या एकलकोंड्या तरीही वेल्हाळ, उन्मुक्त जीवनाबद्दल ते लिहितात,
दास डोंगरी राहतो, सात समुद्रा वाहतो
एकांती राहतो, चिंता विश्वाची वाहतो
अंधारी राहतो, ब्रम्ह प्रकाश पाहतो
विजेसारखा पेटून भूतसमंध भोवतो
 
संसार झाला, जगाची, माणसांची ओळख जाई, जगभर भराऱ्या घेऊन झाल्या की संध्याकाळी घरी परतायचं असतंच. संध्यावेळेची चाहूल..आपलं घर सुद्धा आपल्यासोबत मोठं होतं असतं. मुलांनी त्यांची घरटी केली असतात, बोरकर तेव्हा आपल्या स्वतःच्या मनालाच समजावल्यासारखे शहाणे होतात.
पिलास फुटुनी पंख तयांची
घरटी झाली कुठे कुठे
आता आपली कांचनसंध्या
मेघडंबरी सोनपुटे
कशास निस्त्या चिंता खंती
वेचू पळती सौम्य उन्हे
शिशु हृदयाने पुन्हा एकदा
या जगण्यावर प्रेम करू
 
शेवटी त्या वेळा येतात ज्यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य शब्दशह जगलो असतो आपण. देवाला अर्पण केलेल्या सुगंधी टवटवीत फुलांचा चोळामोळा दुसऱ्या दिवशी बघवत नाही ना? मग आपण त्याला निर्माल्य म्हणतो. तेवढेच आपले समाधान.
पूजेतल्या पानाफुलां
मृत्यु सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा
 
बोरकरांबद्दल थोडं सांगते, मराठी भाषेतील आणि कोंकणी भाषेतील पद्मश्री पुरस्कारविजेते कवी होते. बोरकरांचा जन्म गोमंतकातील कुडचडे या पावन भूमीत ३० नोव्हेंबर इ.स. १९१० या दिवशी झाला. प्रापंचिक अडचणींमुळे त्यांना मॅट्रिकच्या पुढे शिकता आले नाही. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकी पेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. पुढे त्यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामात उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. त्यांचा आज जन्मदिन. त्यांच्या आरस्पानी कवितेला त्यांच्याच शब्दातून नमस्कार
दिव्यत्वाची जेथ प्रतीती
एकांती डोळे भरती
तेथे कर माझे जुळती
तेथे कर माझे जुळती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.