अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी काल निधन झाले. शीतयुद्ध, अमेरिका-व्हिएतनाम संघर्ष, अमेरिका-चीनमध्ये संवाद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत-पाकिस्तान यांच्यात १९७१च्या संघर्षात पाकिस्तानचे समर्थन करणारी व्यक्ती म्हणून हेन्री किसिंजर यांचे नाव घेतले जाते. मुत्सद्दी परराष्ट्र मंत्री म्हणून किसिंजर यांचा उल्लेख अमेरिकेच्या इतिहासात महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून केला जाईल. मात्र, अमेरिकेने कंबोडियावर केलेला बॉम्बहल्ला त्याच कालावधीत किसिंजर यांना संयुक्तपणे मिळालेले शांततेचे ’नोबेल’, त्यामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेला वाद, या सर्व घटना यांचाही उल्लेख होत राहील.
तसे पाहिले तर किसिंजर यांची कारकिर्द जन्मापासूनच वादग्रस्त. मूळ जर्मन-ज्यू असलेल्या किसिंजर यांचे खरे नाव हेन्झ अल्फ्रेड. दुसर्या महायुद्धापूर्वी जर्मनीत ज्यू लोकांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्या कालावधीत हजारो जणांनी जर्मनीचा त्याग करून इतरत्र बस्तान बसविले. शिक्षकपुत्र असलेल्या किसिंजर यांनी १९३८ मध्ये आपल्या कुटुंबासह अमेरिका गाठली. त्यानंतर १९४३ मध्ये अमेरिकन नागरिकत्वही मिळवले. त्यानंतर त्यांनी आपल्या नावापुढे ‘हेन्झ’च्या ऐवजी ‘हेन्री’ जोडले. अमेरिकन नागरिकत्व मिळाल्याने, त्यांना अमेरिकन सैन्यात प्रवेश मिळाला. त्यांनी दुसर्या महायुद्धात युरोपमध्ये सेवा दिली. महायुद्धानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. पदव्युत्तर पदवी आणि ‘डॉक्टरेट’ मिळवली. त्यानंतर तब्बल १७ वर्षे ते हार्वर्ड येथे विद्यादान करत होते. त्याचबरोबर ते सरकारी संस्थांचे सल्लागार म्हणूनही कार्यरत होते. त्यातूनच १९६७ मध्ये त्यांनी अमेरिका-व्हिएतनाम संघर्षाच्या कालावधीत राज्य विभागासाठी मध्यस्थ म्हणून चोख भूमिका बजावली.
उत्कृष्ट संवाद कौशल्य, ज्ञानाचे भांडार आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल ज्ञान या शिदोरीवर किसिंजर यांचे भवितव्य उज्ज्वल होत गेले. त्यावेळीचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम युद्ध संपवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे एकीकडे त्यांचा विजय झाला, तर दुसरीकडे किसिंजर यांच्यासाठी ‘व्हाईट हाऊस’चे दालन खुले केले. त्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती मिळाली. त्याचबरोबर परराष्ट्र सचिव म्हणून अतिरिक्त जबाबदारीही देण्यात आली. ‘मुत्सद्दी व्यक्तिमत्त्व’ अशी ओळख निर्माण झालेले किसिंजर अमेरिकेसाठी उत्कृष्ट परराष्ट्र सचिव ठरले. मात्र, त्यांचा भारताबाबत असलेला आकस वेळोवेळी दिसून आला. कारणही तसेच होते. भारताची त्या कालावधीत रशियाशी घनिष्टता होती. शीतयुद्धाच्या कालावधीत ‘शत्रूचा मित्र तो आपलाही शत्रू’ याप्रमाणे किसिंजर यांनी १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या कालावधीत पाकिस्तानचे सातत्याने समर्थन केले. त्यांची ती भूमिका कायमस्वरुपी वादग्रस्त ठरली.
एकीकडे भारतीय लष्करापुढे ९० हजार पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले, त्याचबरोबर बांगलादेश या स्वतंत्र देशाची निर्मितीही झाली. त्या कालावधीत किसिंजर हे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. त्यांनी युद्धात पाकिस्तानला साथ देताना, भारताची कोंडी करण्याचा डाव टाकला. त्यावेळीचे अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना चीनला भारतीय सीमेजवळ आपले सैन्य तैनात करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे भारतावर दबाव वाढेल आणि ते पूर्व पाकिस्तानमधून माघार घेतील. परंतु, चीनने भारतीय सीमेजवळ सैन्य तैनात करण्यास नकार दिला. त्यामुळे किसिंजर यांचा भारतविरोधी डाव त्यांच्यावरच उलटला. त्यांच्या मुत्सद्देगिरीला मिळालेले, ते सर्वात मोठे अपयश ठरले. ‘व्हाईट हाऊस’मध्ये सतत राबता असल्याने किसिंजर यांनी विविध घटना आणि घडामोडींवर विपुल लिखाणही केले आहे. त्यांचे ‘नेतृत्व शैली’ यावर आधारित एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. १९७०च्या दशकात अचानक चीनला भेट देऊन रशियाला शह देण्याचा प्रयत्नही केला होता.किसिंजर यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत परराष्ट्र धोरणासंदर्भात अमेरिकन सरकारला मोलाचा सल्ला दिला. एक यशस्वी मुत्सद्दी व्यक्ती म्हणून त्यांचा जगभर गौरव केला गेला. मात्र, त्यांची कारकिर्द वादग्रस्तही ठरली, अशा या युगाचा अस्त झाला.
मदन बडगुजर