'माझे आणि बाकीच्या प्रवाशांचे पैसे परत द्या', विवेक अग्निहोत्री इंडिगो एअरलाईन्सवर भडकले

    30-Nov-2023
Total Views |
 
vivek agnihotri
 
मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आजवर दिग्दर्शित केलेल्या त्यांच्या चित्रपटांमधुनच ते किती परखड आणि स्पष्टवक्ते आहेत याची प्रचिती येतेच. दरम्यान, यावेळी विवेक अग्निहोत्री इंडिगो एअरलाईन्सवर भयंकर चिडले असून त्यांनी ट्विट करत इंडिगोच्या विमानाने प्रवास करताना झालेल्या त्रासाबद्दल एअरलाईन्सला खडे बोल सुनावले आहेत.
 
विवेक अग्निहोत्री यांनी पोस्ट करत त्यांना आणि इतर प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल लिहिले आहे. यात त्यांनी विमानातील अस्वच्छता, हवाई सुंदरी यांचा कामचुकारपणा यावरही भाष्य केले. “मी सकाळी सव्वा अकरा वाजता विमानात बसलो आहे. आता १२.४० झाले आहेत. आणि दीडतास कॅप्टन किंवा अन्य कुणाकडूनही कोणत्याच प्रकारची माहिती कळवण्यात आली नाही. मला माहिती आहे की, जगभरात अनेक ठिकाणी फ्लाईटला उशीर होतो. पण अशा प्रकारचा चुकीचा कारभार अनुभवला नसून प्रवाशांबाबतचा इतका निष्काळजीपणा कधी पाहिला नाही. त्यामुळे आमचे पैसे परत द्या”, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
 
दरम्यान, घडलेल्या या प्रकारावर इंडिगोने तक्रारीची नोंद घेतली असून अग्निहोत्री यांच्या त्या पोस्टवर प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी विवेक अग्निहोत्री आणि इतर प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. यापुढील काळात अशा प्रकारच्या कोणत्याही परिस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी आम्ही घेऊ”, असे इंडिगोच्यावतीने सांगण्यात आले आहे.