भारतीय शेयर बाजाराची विक्रमी घोडदौड; चीन, जपानलाही टाकले मागे
30-Nov-2023
Total Views |
मुंबई : देशातील प्रमुख शेअर बाजार बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल बुधवारी दि.२९ नोव्हेंबर रोजी प्रथमच चार ट्रिलियन डॉलर्सच्या पातळीवर पोहोचले. बीएसई सेन्सेक्स बुधवारी ३०५.४४ अंकांनी वाढून ६६.४७९.६४ अंकांवर पोहोचला.
शेयर बाजारातील या तेजीमुळे सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३० कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ३,३३,२६,८८१.४९ कोटी भारतीय रुपयांवर पोहोचले. या भांडवलाची तुलना अमेरिकन डॉलर्समध्ये केल्यास हा आकडा ४ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सला पार करतो.
जागतिक बाजारांमध्ये, भारतीय शेअर बाजार अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगनंतर पाचव्या क्रमांकावर आहे. मे २०२१ मध्ये बीएसई तीन ट्रिलियन डॉलरच्या क्लबमध्ये सामील झाला होता. मागच्या दीड वर्षात भारतीय शेयर बाजाराने एक ट्रिलियन डॉलर्सची भर घातली. मागच्या एका वर्षात भारतीय शेयर बाजाराचे भांडवली मूल्य ६०० अब्ज डॉलर्सनी वाढले आहे. टक्केवारीत विचार केल्यास ही वाढ १५ टक्के इतकी आहे.
पहिल्या पाच शेयर मार्केटमध्ये अमेरिकेच्या शेयर मार्केटचे भांडवल १७ टक्यांनी वाढले आहे. तर याउलट चीनच्या शेयर मार्केट ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. भारतीय शेयर बाजार गुंतवणूकदारांना परतावा मिळून देण्यात अमेरिकेनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२३ या कॅलेंडर वर्षात जगातील सर्व बाजारांचे एकत्रित बाजारमूल्य १० टक्क्यांनी वाढून १०६ ट्रिलियन इतके झाले आहे.