ठाणे भाजपातर्फे 'एक भारत श्रेष्ठ भारत' अंतर्गत १२ राज्यांचा स्थापना दिवस उत्साहात संपन्न
03-Nov-2023
Total Views |
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' अभियानांतर्गत भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने दिल्ली, पंजाब, चंदीगड, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुडुचेरी, अंदमान निकोबार द्वीपसमूह व लक्षद्वीप या १२ राज्यांचा स्थापना दिवस १ नोव्हेंबर रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरा झाला. आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे व भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाचे ठाणे शहर संयोजक राजेश जाधव व सहसंयोजिका ऋजुता देशपांडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
भाजपातर्फे राष्ट्रीय व सांस्कृतिक एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी भारतातील सर्व राज्यांचे स्थापना दिवस ठाणे शहरात साजरे केले जातात. विविध राज्यांच्या परंपरा तसेच संस्कृतीचा मिलाफ दर्शवणारे कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले. आ.संजय केळकर यांनी सर्वांना शुभेच्छा देत राष्ट्रीय एकात्मता अखंड ठेवण्यासाठी एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाच्या योगदानाचे महत्व विषद केले.याप्रसंगी एक भारत श्रेष्ठ भारत या अभियानाच्या गेल्या वर्षभरातील कार्याच्या अहवालाचे अनावरण आ. संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूत्रसंचालक ऋजुता देशपांडे तसेच वर्तकनगर मंडळ अध्यक्ष संतोष जयस्वाल, साधना दातार, प्रगती जाधव, विनय जाधव, अथर्व जोशी, महेश जोशी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.