आयफोन हॅकिंग प्रकरणावर केंद्र सरकार सख्त; अॅपलला पाठवली नोटीस
03-Nov-2023
Total Views | 32
नवी दिल्ली : भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अलीकडेच राजकारणी आणि इतरांना पाठवलेल्या 'सरकार प्रायोजित हॅकर्सपासून सावध रहा' या संदेशावर अॅपलकडून उत्तर मागितले आहे. आयटी मंत्रालयाने गुरुवारी (२ नोव्हेंबर २०२३) अॅपलला नोटीस पाठवून या दाव्याचे पुरावे सादर करण्यास सांगितले. या नोटीसवर मंत्रालयाने अॅपलकडून तत्काळ उत्तर मागितले आहे.
माहितीनुसार, आयटी मंत्रालयाने अॅपलच्या प्रतिनिधींना विचारले आहे की त्यांनी हा हल्ला 'राज्य प्रायोजित' असल्याचे कसे ठरवले? फोन दूरस्थपणे अॅक्सेस केला जाईल आणि संवेदनशील डेटा लीक केला जाईल, असा निर्णय कशाच्या आधारावर घेतला याबद्दल मंत्रालयाने अॅपलला प्रश्न विचारला आहे.
हे उल्लेखनीय आहे की मंगळवारी (३१ ऑक्टोबर २०२३) अॅपलचा आयफोन वापरणाऱ्या अनेक लोकांना कंपनीकडून चेतावणी सूचना मिळाली होती. ऍपल उपकरणे वापरणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांचाही यामध्ये समावेश होता. आयमॅसेज आणि अॅपल मेलच्या माध्यमातून पाठवलेल्या या मेसेजमध्ये सरकार प्रायोजित हॅकर्स तुमच्या आयफोनवर हल्ला करू शकतात, असे लिहिले होते.
यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर हॅकिंग केल्याचे आरोप लावले. विरोधकांच्या या टिकेवर उत्तर देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी असेही सांगितले होते की, अॅपलने १५० देशांमध्ये अशा प्रकारच्या मेसेज अलर्टबाबत अॅडव्हायजरी जारी केली आहे. आता या मुद्द्यावर ठाम राहून त्यांच्या मंत्रालयाने अॅपलकडून उत्तर मागितले आहे. त्यामुळे या कथित फोन हॅकिंगवर अॅपल काय उत्तर देत हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.