मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या आमदार आणि खासदार यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत मराठा आंदोलन, धनगर आरक्षणाची मागणी आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आल्याचे समजते. या बैठकीत तीनही पक्षांचे आमदार आणि खासदार उपस्थित होते.
दरम्यान, आजच्या बैठकीत कुणबी नोंदी शोधण्याचे काम मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात सुरू असून त्याची व्याप्ती वाढवून उर्वरित महाराष्ट्रात हे काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच, शिंदे कमिटीची कार्यक़क्षा वाढविणार आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढविणार तसेच, दर आठवड्याला प्रोग्रेस रिपोर्ट घेणार असल्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
तसेच, मागासवर्ग आयोगाच्या कामाला गती देणार असून टीआयएसएस, गोखले इन्स्टिट्यूट आणि आणखी एका संस्थेची मदत घेणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांची व्याप्ती वाढविण्यावर चर्चादेखील या बैठकीत करण्यात आली.