मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या जीवाला गेल्या काही दिवसांपासून धोका आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने धमकी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी आली आहे. यानंतर मुंबई पोलिस अधिक सतर्क झाले असून त्यांनी सलमान खानच्या सुरक्षेबाबत कठोर पावले उचलली आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कॅनडातील गिप्पी ग्रेवालच्या घरावर हल्ला झाला होता. याच गिप्पी ग्रेवालची सलमान खानसोबत खास ओळख असल्याचे लॉरेन्स बिश्नोई याने सांगितले होते. यानंतर सलमानला आलेल्या जीवानीशी मारण्याच्या धमक्यांनतर मुंबई पोलिस अधिक सावध झाले असून त्यांनी सलमान खानला सद्यस्थितीला वाय प्लस सुरक्षा दिली आहे.
या प्रकरणासंबधी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानला धमकी आल्यानंतर कोणत्याही त्याच्या सुरक्षेबाबत अनेक गोष्टींची पुन्हा तपासणी करण्यात आली. आम्ही त्याच्याशी देखील संपर्क साधला आहे आणि त्याला सतर्क राहण्यास सांगितलं आहे. त्याशिवाय त्याच्या सुरक्षेबाबत काही गोष्टींवर चर्चा केली आहे. अभिनेत्याच्या सुरक्षेत काही त्रुटी असू नयेत यासाठी मुंबई पोलीस पुन्हा सलमानच्या सुरक्षेबाबत तपास करणार आहेत.
दरम्यान, २०२२ रोजी गायक सिद्धू मुसावालाच्या हत्येनंतर सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते. यामुळे गेल्याच वर्षी राज्य सरकारने सलमान खानला व्हाय प्लस श्रेणीची सुरक्षा प्रदान केली होती. सलमान खानसोबत त्याच्या सुरक्षेसाठी ११ सैनिक तैनात केले होते.