मोबाईल निर्मिती क्षेत्रातील क्रांती

    29-Nov-2023   
Total Views |
Article on TATA Invested in Iphone Production

देशातील पहिली ‘आयफोन’ निर्मिती कंपनी असलेल्या ‘टाटा’तर्फे आता एकूण २८ हजार रोजगारनिर्मिती केली जाईल. त्यासाठी सद्यःस्थितीतील निर्मिती कारखान्यांची क्षमता दुप्पट होऊन, आगामी १८ महिन्यांत ते पूर्णपणे कार्यान्वित होतील. यानिमित्ताने भारतातील मोबाईल निर्मिती क्षेत्रातील बाजारपेठेचा घेतलेला हा आढावा...

काँग्रेस खासदार राहुल गांधी दोन आठवड्यांपूर्वी मध्य प्रदेशातील एका प्रचार सभेत बोलताना म्हणाले की, ”देशात प्रत्येकाच्या मोबाईल फोनवर ’मेड इन चायना’ असे लिहिले आहे. आम्हाला ही ओळख बदलायची आहे. आम्ही इथल्या मोबाईल फोनवर ’मेड इन मध्य प्रदेश’ लिहिलेले पाहू इच्छितो.” अर्थात, देशाबाहेर किंवा देशांतर्गत विकल्या जाणार्‍या कुठल्याही वस्तूवर मूळ देश (कंट्री ऑफ ओरिजीन) लिहिण्याचा प्रघात आहे. याची युवराजांना कदाचित कल्पना नसावी. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर केलेली टिपण्णी काँग्रेस आणि राहुल गांधींना फार झोंबणारी होती. राहुल गांधींना त्यांनी भारतातील मोबाईल उत्पादनाच्या आकडेवारीचा दाखला देत, देश कुठे उभा आहे, याची जाणीव करून दिली. हा झाला एक प्रसंग. यापूर्वीही अशीच एक गोष्ट राहुल गांधींच्या भाषणादरम्यान घडली होती. ’मेक इन इंडिया’ची सुरुवात होऊन वर्ष उलटले होते.

२०१५ मध्ये राहुल गांधी बंगळुरूतील एका महिला महाविद्यालयात मुक्तसंवादासाठी उपस्थित होते. राहुल गांधींनी विद्यार्थिनींना प्रश्न केला की, ”तुम्हाला देश स्वच्छ झालेला दिसतोयं का?” समोरून उत्तर हो, असे मिळाले. राहुल गांधींचा चेहरा तेव्हा पाहण्यासारखा होता. मग थोडे सावरून त्यांनी पुन्हा एक प्रश्न उपस्थित केला की, ”तुम्हाला ’मेक इन इंडिया’ ही मोहीम यशस्वी पार पडली, असे वाटते का?” समोरून पुन्हा उत्तर ‘हो’ असेच मिळाले. या दोन्ही भाषणांचे व्हिडिओ आजही युट्यूबवर उपलब्ध आहे. तात्पर्य एवढेच की, अशा महत्त्वाच्या पदावर असणार्‍या व्यक्तींकडे आकडेवारी आणि संदर्भांची माहिती नसेल आणि केवळ टीका करण्यासाठी म्हणून आपण भाषणे देत सुटणार असू, तर जगजाहीर फजिती होईल ती वेगळी आणि आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होईल, ती वेगळीच. पण, राहुल गांधींना ही बाब आजवर कधी कळली नाही, तर भविष्यातही काही प्रकाश पडेल, याची सुतराम शक्यता नाहीच!

भारतातील ’मेक इन इंडिया’ मोहिमेच्या यशाचा डंका एव्हाना देश-विदेशातही गाजू लागला. मात्र, केवळ सरकारवर टीका करण्यासाठी भाषणे ठोकणार्‍यांना तो कळू शकला नाही, इतकेच. ’टाटा म्हणजे विश्वास’ अशी ओळख असणार्‍या या कंपनीनेही याच क्षेत्रात पाऊल टाकले आणि आता ही पावले विस्तारण्याच्या दिशेने पडू लागली आहेत. ‘आयफोन’ निर्मितीच्या क्षेत्रातील पहिलीवहिली भारतीय कंपनी आता ’आयफोन’ केसच्या निर्मितीसाठी आपल्या कक्षा रुंदावत आहे. सद्यःस्थितीत सुरू असलेल्या निर्मिती प्रकल्पांचा विस्तार दुप्पट होणार आहे. या अंतर्गत एकूण २८ हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होईल.

एका छताखाली हे २८ हजार कामगार कार्यरत असतील. सद्यःस्थितीत ५०० एकरच्या परिसरात असलेल्या या कारखान्याची क्षमता दुप्पट केली जाईल. शिवाय सध्या असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या १५ हजारांवरून दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. पुढील १२ ते १८ महिन्यांत हे कार्य प्रगतिपथावर येईल, असा दावा ’इकोनॉमिक टाईम्स’ने केलेल्या एका अहवालात करण्यात आला आहे. पण, मग ’टाटा’ कंपनी भारतातील पहिली ‘आयफोन’ उत्पादक कशी बनली? या इतिहासाकडेही लक्ष टाकले पाहिजे. ‘फॉक्सकॉन’, ‘विस्ट्रॉन’ आणि ‘पेट्रागॉन’ या तीन कंपन्या यापूर्वी भारतात ‘आयफोन’ उत्पादन करत होत्या. त्यानंतर ऑक्टोबरला मुंबईतील मुख्यालयात तैवानच्या ‘विस्ट्रॉन कॉर्पोरेशन’शी १२५ दशलक्ष डॉलर्सला हा करार झाला आणि ‘टाटां’नी या क्षेत्रात पदार्पण केले.

दुसरीकडे चीनच्या तापाला कंटाळून ‘फॉक्सकॉन’ही आपला विस्तार भारतात वळवण्याच्या प्रयत्नात आहे. तुलनेने कमी किमतीत मिळणार्‍या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, उत्पादन क्षमता या पातळ्यांवर भारताने जगाचा संपादित केलेला विश्वास पाहता, ’आयफोन’ निर्मिती क्षेत्रातील या कंपन्यांनीही भारताकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पावले वळवली आहेत. ’टाटा’ कंपनीने निर्मिती केलेल्या ‘आयफोन’साठी भारतीय बाजारपेठेसह जागतिक बाजारपेठेकडेही सकारात्मक दृष्टीने पाहिले जात आहे.

याच आठवड्यात ‘फॉक्सकॉन’च्या ’हॉन हाय टेक्नोलॉजी इंडिया’तर्फे एकूण १.६ अब्ज डॉलर्स इतकी गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आली. ‘फॉक्सकॉन’ने यापूर्वीच भारतात एकूण ६०० दशलक्ष डॉलर्स इतकी गुंतवणूक केली आहे. ‘फॉक्सकॉन’ला ही गुंतवणूक आणखी वाढवण्याची इच्छा आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, आशियातील अन्य देशांची चाचपणीही या कंपन्या करत आहेत. महाराष्ट्रातही या कंपनीच्या उपकंपन्यांची नोंद २०१५ पासूनच आहे. ‘कोविड’ काळात चीनने सुरू केलेली मनमानी, जागतिक बाजारपेठेत निर्माण केलेला तणाव पाहता, आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे. भारताकडे या कंपन्या एक आश्वासक बाजारपेठ म्हणून पाहतात. भारतीयांनी संकटकाळात एकत्र येऊन आरोग्य, उत्पादन, सेवा आणि अन्य क्षेत्रांत जी कामगिरी केली, त्याची सर्वांगीण दखल जगाला घ्यावीच लागली.

भारत आज ’टेलिकॉम’ क्षेत्रात एक ’नेतृत्व करणारा देश’ म्हणून उदयास आला आहे. पूर्वी मोबाईल टॉवरच्या परवानगीसाठी २३० दिवस लागत, हीच गती आज केवळ सात दिवस इतकी झाली आहे. जितक्या गतीने मोबाईल आणि इंटरनेट सेवा ही गावाखेड्यात पोहोचेल, तितक्याच गतीने भारत प्रगतिपथावर जाईल. गावागावात पडत असलेली मोबाईल नेटवर्कची पावले या क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणणार आहेत. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ’इंडियन मोबाईल काँग्रेस’मध्ये नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, ”भारत हा ९० हजार कोटींपेक्षा जास्त किमतीच्या मोबाईल फोन्सची निर्यात करतो. आजघडीला ९९ टक्के मोबाईल फोन्स हे भारतात उत्पादन केले जातात.” ही खरोखरीच मोठी उपलब्धता आहे. भारत जगातील अग्रगण्य बाजारपेठ तयार झाली असून, या कारणास्तव ‘अ‍ॅपल’ असो वा अन्य कुठल्याही आघाडीच्या कंपन्यांना भारतीय निर्मिती क्षेत्रात पाय ठेवल्याशिवाय पर्याय नाही, हे या गोष्टींनी दाखवून दिले आहे.“ राहिला प्रश्न काँग्रेस आणि इतर विरोधकांचा तर “मोदींना विरोध करता करता, देशाला विरोध कधी करू लागलेत हे त्यांचे त्यांना कळेनासे झाले आहे,“ असा काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी दिलेला घरचा आहेर बोलका ठरावा.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.