रसिका शिंदे-पॉल
मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या यशानंतर ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहुर्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे यांनी ‘महाएमटीबीशी’ संवाद साधताना अभिनेता प्रसाद ओक याचे दिग्दर्शकाला प्रश्न विचारणारा नट अशा शब्दांत कौतुक केले.
“प्रश्न विचारणारा अभिनेता चित्रपटाला समृद्ध करतो. प्रसाद ओक प्रश्न विचारतो. दिघे साहेब एखादा संवाद बोलताना त्यांच्या डोळ्यात राग असेल असं त्याला सांगितलं तर तो का विचारतो. मग त्याला कारण सांगायचं. मग तो राग येण्यासाठी त्याला तो दगड उचलून भिरकाव असं सांगितलं की तो का उचलू असा प्रतिप्रश्न त्याचा तयारच असतो. तात्पर्य काय तर जो कलाकार हा स्वत: अभिनेता, राष्ट्रीय पुरस्कार विजेता जरी असला तरी त्याला प्रत्येक भूमिका करताना जर का पोटात गोळा येत असेल, भीती वाटत असेल, तर तो सच्चा कलाकार आहे. तसा सच्चा आणि उत्तम अभिनेता प्रसाद ओक आहे”, अशा शब्दांत दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी प्रसाद ओकचे कौतुक केले.
‘धर्मवीर २... साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला ९ डिसेंबर २०२३ पासून सुरुवात होणार आहे. चित्रपटाचे चित्रिकरण जानेवारीपर्यंत पुर्ण करत एप्रिल-मे मध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस असल्याचे निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितले आहे.