गवताळ प्रदेशातील वृक्षारोपाणामुळे गमवाव्या लागतात ४ स्थानिक प्रजाती; संशोधन

महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा संशोधन अहवाल प्रकाशित

    28-Nov-2023   
Total Views |
maharshtra grasslands



मुंबई (विशेष प्रतिनिधी): गवताळ प्रदेशांमध्ये (grassland) वृक्षारोपण आणि शेती केल्यास त्याच्या परिणाम गवताळ प्रदेशातील स्थानिक प्रजातींवर पडत असल्याचे संशोधन समोर आले आहे. गवताळ प्रदेशांवरील (grassland) वृक्षरोपणामुळे प्रामुख्याने चार आणि शेतीमुळे सहा स्थानिक प्रजातींच्या अस्तित्त्वावर गदा येते. या दोन्ही लागवडीमुळे गवताळ प्रदेशातील (grassland) एकंदरीत ६५ स्थानिक प्रजातींना धोका निर्माण होतो, असे  'जर्नल ऑफ इकोलॉजी' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये नमूद करण्यात आले आहे. (grassland)


maharshtra grasslands


कायमच दुर्लक्षित आणि कमी महत्त्व दिलेली गवताळ प्रदेश परिसंस्थेचं महत्त्व एका संशोधनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखीत झालं आहे. जंगल अधिवास नष्ट केला तर मोठे नुकसान होते मात्र, गवताळ प्रदेश परिसंस्था नष्ट केली तर तिचे फारसे नुकसान आपण करत नाही असा एक समज आहे. मात्र, याच समजाला विरोध दर्शवत गवताळ प्रदेश परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखीत करणारा एक संशोधन अहवाल नुकताच 'जर्नल ऑफ इकोलॉजी' या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या सात जिल्ह्यांमधील गवताळ प्रदेशांवर २०२० सालापासून संशोधकांच्या एका चमुने संशोधन केले आहे. डॉ. आशिष नेर्लेकर, अविष्कार मुंजे, प्रणव म्हैसाळकर, डॉ. अंकिला हिरेमठ आणि डॉ. जोसेफ वेल्डमन या पाच शास्त्रज्ञांनी हे संशोधन पूर्ण केलं. सात जिल्ह्यांमधील विविध पर्जन्यमान असलेल्या परिसरांची अभ्यासासाठी निवड करुन एक मीटर चौरसच्या चौकटी करुन तीन टप्प्यांत हे संशोधन केले गेले. झाडे लावा, झाडे जगवा या अभियानांतर्गत अशास्त्रीय दृष्टीकोनातून केलेले वृक्षारोपण कसे नुकसानकारक होऊ शकते हे शास्त्रज्ञांनी पटवून दिले आहे.

dr. ashish nerlekar


नैसर्गिक गवताळ प्रदेशामध्ये साधारणपणे एक चौरस मीटरच्या चौकटीत १२ स्थानिक प्रजाती आढळतात. अशा गवताळ प्रदेशांमध्ये वृक्षारोपण केले तर त्या भागेतील ४ स्थानिक प्रजाती गमवाव्या लागतात असे संशोधनामधून निदर्शनास आले. गवताळ प्रदेशाचे सपाटीकरण करुन शेती असलेल्या भागात ९ स्थानिक प्रजाती गमावल्या असल्याचे लक्षात आले. तर, पडीक जमीनीवरील संशोधनामध्ये हे प्रमाण वाढून ६ वर गेले. एकुणच शेतीमुळे आणि वृक्षारोपणामुळे जवळजवळ ६५ स्थानिक प्रजाती पुन्हा उगवू शकल्या नाहीत म्हणजेच त्या नामशेष झाल्या. या संशोधनामधून गवताळ प्रदेश परिसंस्थेतील नष्ट झालेल्या स्थानिक प्रजातींना पुन्हा येण्यासाठी अनेक दशकांचा काळ जावा लागू शकतो असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
 
"गवताळ प्रदेश परिसंस्थेच्या झालेल्या नुकसानामुळे त्या परिसंस्थेतील ६५ स्थानिक प्रजाती ही आपण गमावल्या याची कुठेही नोंद आढळत नाही. सार्वजनिक, सामाजिक धोरणांमध्ये ही कुठे नोंद आढळत नाही ही बाब चिंतनीय आहे. गवताळ प्रदेश ही परिसंस्था ही तितकीच महत्त्वाची असून त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असायला हवे."

- डॉ. आशिष नेर्लेकर
संशोधक



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.