नाशिक : भारतात लढाऊ विमानांच्या उत्पादनात वेगाने वाढ होत आहे. भारत सरकारच्या मालकीची कंपनी असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने आपले स्वदेशी बनावटीचे तेजस विमानाचे नविन उत्पादन केंद्र नाशिक येथे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एचएएलकडे एकावर्षात १६ विमाने तयार करण्याची क्षमता आहे. कंपनीला आपली क्षमता २४ विमानांपर्यंत वाढवायची आहे.
उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये तिसरी लाईन उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एचएएलने दिली आहे. सध्या एचएएलकडे तेजस विमानाच्या उत्पादनासाठी दोन लाईन उपलब्ध आहेत. पण भारतीय हवाई दलाची मागणी पूर्ण करण्यासाठी एचएएलला आपल्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करावी लागणार आहे.
एचएएलला २०२५-२६ पर्यंत भारतीय हवाई दलाची ८३ तेजस मार्क १ विमानांची ऑर्डर पूर्ण करायची आहे. भारतीय हवाई दलाकडे आधीपासूनच तेजसच्या लढाऊ विमानाच्या दोन स्क्रार्डन तैनात आहेत. तेजस हे लाईट कॉम्बेट श्रेणीतील लढाऊ विमान आहे. तेजसमध्ये लागणारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक सामग्री ही भारतातच बनते.