शिवसेनेचा आक्रमक चेहरा हरपला; शिंदे गटाच्या महिला नेत्याचे निधन
28-Nov-2023
Total Views | 69
शिवसेनेच्यानाशिक जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शोभा मगर यांचे मंगळवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रकृती बरी नसल्यामुळे काही दिवसांपुर्वीच त्यांना उपचारासाठी नाशिकच्या सुधर्म रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा हिरावाडीतील रेशीमबंध मंगल कार्यालयातून निघेल व पंचवटीतील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
नाशकातील एक आक्रमक राजकारणी अशी त्यांची ओळख होती. ठाकरे गटातून शिंदे गटात गेल्यानंतर त्यांची उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी नियुक्ती केली गेली होती. नाशिकमध्ये तळागाळात त्यांचा दांडगा संपर्क होता. नाशकात शिवसेनेची सत्ता नसतानाही अनेक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. नाशिक मध्ये शिवसेनेची सत्ता आणण्यात देखील त्यांचा खारीचा वाटा होता.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी ठाकरे गटात राहण्यास पसंती दर्शवली. मात्र, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर काही नेत्यांशी मतभेदामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांच्या पश्चात २ मुले, सुना, नातवंड असा परिवार आहे.