बीजिंग : चीनमध्ये मागच्या काहीदिवसांपासून कोरोना सदृश महामारीने थैमान घातले आहे. तीव्र तापाबरोबरच दम लागणाऱ्या या आजारामुळे हजारो लहान मुलं रुग्णालयात दाखल झाले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा आजारही कोरोनासारखा संसर्गजन्य आहे, एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होतो.
चीनमधील या आजाराने जगाची चिंता वाढली आहे. २०१९-२० मध्ये चीनमधूनच जगभरात कोरोना महामारीचा प्रसार झाला होता. चीनमधून सुरुवात झालेल्या या कोरोना महामारीमुळे जगभरात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. म्हणून, डब्ल्यूएचओने मुलांमध्ये अज्ञात न्यूमोनियाच्या क्लस्टर्सच्या अहवालाचा हवाला देत चीनकडून अधिक माहिती मागवली आहे.
२०१९-२० मध्ये कोरोना महामारीच्या वेळी डब्लूएचओने चीनच्या विरोधात स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळे टीका झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्लूएचओची फंडिगसुद्धा रोखली होती. कोरोनाच्यावेळी झालेली टीका टाळण्यासाठी डब्लूएचओने चीनकडे या महामारीशी संबंधित माहिती मागितली आहे.