मुंबई : रेल्वे परिसरातील अनधिकृत बांधकामामुळे विकासकामात येणारा अडथळा लक्षात घेता मध्य रेल्वेने परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बडगा उगारला आहे. मध्य रेल्वेतर्फे सोमवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी हार्बर मार्गावरील जीटीबी नगर आणि चुनाभट्टी रेल्वेमार्ग परिसरातील १६५ अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवला आहे. येथील १४० छोटी दुकाने आणि २५ झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे बेलापूर येथे कर्तव्य बजावणाऱ्या स. उ. नि. शेख साजिद यांनी कर्मचाऱ्यांसह पीडब्लूआय मानखुर्द अजित यांच्या उपस्थितीत जीआरपी व स्थानिक पोलिसांच्या मदतीने जुईनगर येथील सानपाडा दरम्यानच्या विभागात अनधिकृतपणे उभारण्यात आलेले कच्चे घर जमीनदोस्त केले आहे. तसेच घणसोली- रबाळे, बेलापूर स्थानक परिसरादरम्यान असणाऱ्या अनधिकृत बांधकामावरही हातोडा मारला आहे.
संबंधित बांधकाम अनधिकृतच असते. परिसरात अनधिकृत बांधकामांना योग्य वेळी आळा घातला नाही, तर अनधिकृत बांधकाम वाढतच जाते. त्यामुळे इतर समस्यांसह रेल्वेच्या विकास कामातही अडथळा निर्माण होतो. आगामी काळात ही कारवाई सुरूच राहणार असून लवकरच विक्रोळी, भांडुप आदी स्थानकादरम्यान असणारी बांधकामेही पाडण्यात येतील.
- डॉ. शिवराज प. मानसपुरे (भा.रे.या.से.), मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे