दहशतवाद संपेपर्यंत युद्ध सुरूच राहणार; बेंजामिन नेतन्याहूंचा इशारा

    27-Nov-2023
Total Views |

Benjamin Netnyahu


जेरुसलेम :
इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या एक ते दीड महिन्यापासून युद्ध सुरु आहे. हे युद्ध चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय इस्त्रायल आणि हमासकडून घेण्यात आला होता. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा पट्टीला भेट देत युद्धबंदी झाली असली तरी दहशतवाद संपेपर्यंत हे युद्ध सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
 
शुक्रवार २४ नोव्हेंबरपासून इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम कराराची सुरुवात झाली. यादिवशी हमासने २४ ओलिसांची सुटका केली. यात यामध्ये १३ इस्रायली, थायलंडचे १० आणि फिलिपाईन्सच्या एका नागरिकाचा समावेश आहे. त्यानंतर युद्धविरामाच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा १७ जणांची सुटका करण्यात आली. यामध्ये १४ इस्त्रायली आणि ३ थायलंडचे नागरिक होते. यानंतर हमासने रविवारी एका निवेदनात इस्त्रायलला युद्धविराम वाढवण्याची मागणी केली. परंतु, जर हमास दररोज १० ओलिसांची सुटका करण्यास तयार असेल तर युद्धविराम वाढवणार असल्याचे इस्त्रायलने म्हटले.
 
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा पट्टीला भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या सैनिकांची भेट घेत गाझा पट्टी आता इस्रायलच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट केले. तसेच जोपर्यंत दहशतवाद संपत नाही तोपर्यंत युद्ध थांबणार नाही, असेही त्यांनी म्हटले,
 
ते म्हणाले की, “आम्ही आमच्या लोकांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. सर्व ओलिसांना परत आणणे, हमासचा नाश करणे आणि गाझा पुन्हा कधीही इस्रायलसाठी धोका बनणार नाही याची खात्री करणे, ही आमची तीन उद्दिष्टे आहेत," असेही ते म्हणाले.