जगण्यातील अपूर्वाई!

    27-Nov-2023
Total Views | 86
Article on Apurva Darshetkar

आर्थिक स्थैर्य देणारी नोकरी सोडून, स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करत ‘अपूर्वा क्रिएशन्स’ हा ब्रॅण्ड प्रस्थापित करणार्‍या उद्योजिका अपूर्वा दारशेतकर यांच्या जीवनप्रवासाविषयी...

आपण नेमकं कसं जगायचं, असा विचार करणारा आणि खरोखरच तसा विचार न करता प्रत्यक्षात तसं जीवन जगणारा, असे दोन वर्ग समाजात प्रामुख्याने दिसतात. त्यामुळे मनासारखं जगता येणं, ही भावनाच खरं तर खूप रोमांचकारी. ते कामच काय करायचं, जिथे आपलंच मनच रमत नाही. असाच विचार करुन नाशिकच्या अपूर्वा निखिल दारशेतकर यांनी आपली वेगळी वाट धुंडाळत, आपल्या कलेला व्यवसायाचे रूप देत ’अपूर्वा क्रिएशन्स’ हा ब्रॅण्ड सुरू केला.

कलासक्त अपूर्वा यांनी सुरुवातीला केवळ स्वतःच्या विरंगुळ्यासाठी म्हणून एम्ब्रॉयडरी शर्ट पेंटिंग, बेडशीट, कुर्ते पेंटिंग करायला सुरुवात केली. त्यांच्या आगळ्यावेगळ्या डिझाईन्स लोकांना आवडल्याने त्यांच्या ओळखीतल्या लोकांनी त्यांना ऑर्डर द्यायला सुरुवात केली. अपूर्वा यांनी आधी केवळ आपल्या मित्रमंडळींसाठी अशाच ऑर्डर्स स्वीकारल्या; परंतु याला व्यवसायाचे स्वरूप कधी प्राप्त होईल, असा विचारही त्यांच्या मनाला कधी स्पर्श शिवला नाही.

अपूर्वा यांचे ‘बॅचलर इन व्हिज्युअल आर्ट्स’मध्ये शिक्षण झाले, त्यानंतर त्यांनी काही काळ एका अ‍ॅनिमेशन स्टुडिओसाठी ’२-डी अ‍ॅनिमेटर’ म्हणूनही काम केले. परंतु, काही काळ गेल्यानंतर, त्यांना त्याच्या चाकोरीबद्ध कामाचा कंटाळा यायला लागला. सतत काही तरी नवीन केल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. एवढी चांगली, आर्थिक स्थैर्य देणारी नोकरी सोडू नये, असेच त्यांच्या कुटुंबीयांना वाटत होते.
 
अनेकदा असं होतं की, एखादी व्यक्ती एखादा निर्णय घेते आणि काही काळाने स्वतःच्याच निर्णयाबद्दल शंकाकुशंका उपस्थित होऊ लागतात. मात्र, सरळ मार्गाने न चालता काहीतरी वेगळं करणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा प्रसंग एकदा तरी येतोच. नोकरी सोडून आपलं काही चुकलं नाही ना, असा प्रश्न सुरुवातीला अपूर्वा यांच्या मनालाही अस्वस्थ करुन गेला.पण, मुळात अपूर्वा या चाकोरीपलीकडचा विचार करणार्‍या. त्यामुळे त्यांची एक विचार करण्याची विशिष्ट पद्धत आहे, हे त्यांच्या कुटुंबीयांनाही ठाऊक होते. या सगळ्यामुळे का होईना, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पाठिंबा दिला. बरेचदा जेव्हा अपूर्वा यांनाच नोकरी सोडण्याच्या निर्णयाबद्दल साशंकता वाटत होती, त्यावेळी कुटुंबीयांनीच व्यवसाय करण्याच्या निर्णयाची सकारात्मक बाजू सांगून, त्यांना नवीन उभारी दिली. अपूर्वा यांनी नोकरी सोडली, तेव्हा एखादा उपक्रम किंवा ठरावीकच गोष्ट करायची असं ठरवलेलं नव्हतं. त्यांना जसं काम मिळत होतं, त्याप्रमाणे ते करत गेले. यात वारली फ्रेम, बेडशीट पेंटिंग कुर्ते एम्ब्रोईडरी अशा अनेक गोष्टी होत्या.

सुरुवातीला अपूर्वा यांनी पेंट करत असलेले टी-शर्ट हे ग्राहकाच्या आवडीनुसार होते. यात अनेकदा त्यांना लहान मुलं स्वतःहून काही कल्पना सूचवत. त्यानंतर त्यांनी काही त्यांच्या मनाप्रमाणे डिझाईन तयार करून, त्या विकायला सुरुवात केली. या काळात अपूर्वा अनेकदा एखाद्या शाळेत किंवा महिलांसाठी पेंटिंगच्या खास कार्यशाळा आयोजित करीत. त्यांच्या डिझाईन लोकांना खूप आवडत होत्या. त्यांनी तयार केलेले टी-कोस्टर्स, सर्व्हिंग ट्रे यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने, काही ओळखीच्या लोकांनी अपूर्वा यांच्याकडून आग्रह करून काही वस्तू ’कस्टमाईज्ड’ करून घेतल्या.

दरम्यानच्या काळात अपूर्वा यांनी सोशल मीडिया माध्यमांचा आधार घेत, त्याचं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावे, यासाठी ’अपूर्वा क्रिएशन्स’ या नावाने अकाऊंट सुरू केले. नाशिकव्यतिरिक्त इतर शहरांतून सुद्धा त्यांच्या कामाला भरपूर ऑर्डर्स मिळू लागल्या. ’लॉकडाऊन’च्या काळातही अपूर्वा यांनी अनेक प्रकारचे टी-कोस्टर्स, एम्ब्रॉयडरी वर्क असलेले कुर्ते, हॅण्ड पेंट बेडशीट ऑनलाईन विकले. त्याचप्रमाणे वारली पेंटिंग, डूडल्स, पॉट पेंटिंग, बुकमार्क मेकिंग, लग्नात तयार करण्यात येणारे सजावटीचे ताट, पणत्या, रांगोळ्या यांच्या ऑनलाईन पद्धतीने शिकवणी घेतल्या. सोशल मीडियाचा असाही फायदा होऊ शकतो, हे त्यांना स्वप्नातही वाटत नसल्याचे त्या सांगतात.

अनेकदा डेडलाईन असूनही, हातात असलेले काम कसंही रेखाटून देणं किंवा ‘कस्टमाईज्ड’ करून देणे त्यांना जमत नसल्याचे अपूर्वा सांगतात. त्यांच्या डोक्यात आलेली कल्पना प्रथम त्या कागदावर उतरवतात. जर मनाला समाधान पटलं, तरच त्याला योग्य स्वरूप देतात. या छोट्या-छोट्या तपशिलांमागे बरीच मोठी प्रक्रिया असते. शेवटी हे एक सर्जनशील काम आहे. त्यांच्याकडे कामाच्या गर्दीपेक्षा त्यांच्या कलेचे दर्दी असणारी लोक त्यांना कायमच आपलेसे वाटतात.

रोजच्या जीवनात घडणार्‍या साध्या-सोप्या गोष्टींना अपूर्वा त्यांच्या कलेतून लोकांसमोर आणत असतात. ’अपूर्वा क्रिएशन्स’ हा एक नावाजलेला आणि प्रसिद्ध ब्रॅण्ड म्हणून नावारुपास यावा, अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. अपूर्वा दारशेतकर यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ तर्फे हार्दिक शुभेच्छा!

गौरव परदेशी 
अग्रलेख
जरुर वाचा
अभिजीतला

अभिजीतला 'अमोल' साथ; 'सुंदर मी होणार’ नाटकात अभिजीत चव्हाण आणि अमोल बावडेकर दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!

चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या सशक्त भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक वर्षानंतर मराठी रंगभूमीवर काम करणार आहेत. स्वतःची विनोदी इमेज ब्रेक करत एक अत्यंत गंभीर आणि भावनिक पात्र साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिजीत यांना साथ करत अभिनेते अमोल बावडेकर यांचा ही अनोखा अंदाज या नाटकात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121