आता तयारी टी-२० ‘विश्वचषका’ची...

    26-Nov-2023
Total Views |
Indian Team Plans For Upcoming T20 World Cup

आता परत एकदा ऑस्ट्रेलियाला टी-२०मध्ये पराभूत करण्याची संधी भारताला चालून आली आहे. तो आनंद समस्त भारतीयांनी आता घ्यायचा आहे. या टी-२०च्या विजयाने आपल्याला ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय सामन्यात नमवता न आल्याच्या जखमेवर थोडीफार का होईना फुंकर घालता येईल.

क्रिकेटच्या ताज्या जागतिक क्रमवारीनुसार, एकदिवसीय सामन्यात १९ संघांमध्ये भारत प्रथम क्रमांकावर असून, नंतर दुसरा क्रमांक ऑस्ट्रेलियाचा तर पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. टी-२० मध्ये ८७ संघांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलिया चौथ्या व पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. कसोटी सामन्यात दहापैकी भारत प्रथम, ऑस्ट्रेलिया द्वितीय तर पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे. हे आकडे बघता क्रिकेटमध्ये भारत आजही अव्वलच असल्याचे दिसून येईल. सगळ्या विश्वात कसोटी, एकदिवसीय व टी-२० क्रिकेटमध्ये फूटबॉलच्या तसेच अन्य ’ऑलिम्पिक’ क्रीडा प्रकारांच्या तुलनेत फार कमी देशांत क्रिकेट खेळतात, तरीही त्यांच्यातल्या त्यांच्यात क्रिकेटचा विजेता कोण हे ठरवण्यासाठी खेळवल्या जाणार्‍या स्पर्धेत विजयी संघाच्या देशाला ’विश्वचषक’ विजेता म्हणून सारे जग संबोधते. हे क्रिकेटचे विशेष आहे.
 
भारतीय क्रिकेटला दृष्ट लागू नये, असे सगळे आलबेल चालू असताना; मात्र फक्त ऑस्ट्रेलियावर आपण अंतिम सामन्यात मात करू शकलो नाही, याच्यावर लगेच वादळ निर्माण होत, हे तितकेसे मनाला पटत नाही. एखादी हार होणारच. भारतातील लोकप्रिय खेळ क्रिकेट, आर्थिकदृष्ट्याही श्रीमंत खेळ क्रिकेटचा, त्याच्या श्रीमंत लीगमध्ये जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेली लीग ’आयपीएल’ त्याचे पाच वर्षांचे मीडिया हक्क सहा अब्ज डॉलर्सना विकले जातात. जागतिक क्रिकेटमधील ८० टक्के उत्पन्नात भारताचा हातभार लागत असतो. भारताच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे चार वर्षांच्या प्रक्षेपणाच्या हक्काची सुमारे तीन अब्ज डॉलर्सना विक्री होते. अशी केवळ आर्थिक बाबतीतच नव्हे, तर ती ताकद ज्याच्या बळावर मिळते, ते भारतीय क्रिकेटचे जागतिक क्रमवारीतले स्थानदेखील उच्चपदावर टिकलेले असते, असे हे भारताचे क्रिकेट. आतापर्यंत कसोटी, एकदिवसीय तसेच टी-२० क्रमवारीत एकाचवेळी सर्वोत्तम होते. पण, आता या एका पराभूत होण्याने डळमळीत होण्याची वेळ लोकांमध्ये निर्माण होत येत असेल, तर ते बरोबर नाही. ते डळमळीत होऊ नये, याची काळजी आपल्या संघाने घेतली असली, तरीदेखील ऑस्ट्रेलियाने आपल्याला शह दिला आहे, हेही तितकेच खरं आहे. आता ५० षटकांतून काही बोध २० षटकवाले नक्की घेतील आणि आपली प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्यात मदत करतील.
 
आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी, आपला शेजारी पाकिस्तान. त्याच्या विरुद्धची लढत ही राष्ट्रीयत्वाचे प्रतीक मानले जाते. पाकिस्तान विरुद्धचा सामना मग तो अधिकृत नसला, तरी राष्ट्रीय खेळ म्हणून गणला जाणारा हॉकीसारख्या खेळाचा असो अथवा आपल्यात जो केवळ ’खेळ’ नव्हे, तर एक ’धर्म’ म्हणून मानला जाणारा क्रिकेटचा सामना असो, त्यावेळेस तो रणांगणासारखाच खेळला जातो. या ’विश्वचषक’ स्पर्धेत आपण पाकिस्तानला पराभूत करू शकलो. एवढेच नव्हे तर ऑस्ट्रेलियाच्या याच संघाला रोहित शर्माच्या याच संघाने साखळी सामन्यात पराभूत केले होते. असे असूनही भारत अंतिमतः ’विश्वचषक’ पटकावू शकला नाही, ही खेळाडू व प्रेक्षक यांच्यासह समस्त भारतीयांना खंत लागून राहिली आहे.

आता याच ५० षटकांच्या एकदिवसीय सामन्यांच्या ’विश्वचषक’ विजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध २० षटकांच्या टी-२० सामन्यांच्या मालिका होत आहेत. पाच सामने भारत-ऑस्टेलिया यांच्यात भारतातच खेळवले जात आहेत. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून पराभव केला. विशाखापट्टणमच्या क्रीडांगणावर गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २० षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या झंझावाती खेळीमुळे शेवटच्या षटकात लक्ष्याचा पाठलाग केला. एक चेंडू शिल्लक असताना रिंकू सिंगने भारताला विजय मिळवून दिला. दुसर्‍या ट्वेन्टी-२० सामन्यात २६ नोव्हेंबरच्या रविवारी थिरुवनंतरपुरम येथे ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाच सामन्यांच्या मालिकेतील आपली आघाडी दुप्पट करायची असे ठरवून भारतीय संघ उतरला, तर ऑस्ट्रेलियाचा संघ बरोबरी साधण्यासाठी उतरला. आपल्याला खरे म्हणजे फलंदाजीच प्रथम हवी होती. प्रारंभी पर्जन्यराजाच्या नव्हे तर भारताच्या तीन फलंदाजांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडत धमाकेदार अर्धशतक झळकवले. हा लेख लिहून पाठवेपर्यंत ऑस्ट्रेलियापुढे २३६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रविवारचा शेवट भारतीय शौकिन अशा पावसात भिजत आनंद घेत राहिले. तसा शनिवारी तेथे मुसळधार पाऊस झाला होताच. रविवारीदेखील पाऊस कधीही पडू शकत होता. असे सामने बघत बघत आता उरलेले सामने खरे उत्कंठावर्धक होतील आणि त्यातदेखील भारताने विजय मिळवून दिला तर एकदिवसीय सामन्यातल्या पराभवाला लोक माफ करतील, याची नक्कीच खात्री आहे.

तसे म्हटले तर कसोटी सामन्यांव्यतिरिक्त खेळल्या जाणार्‍या ५० व २० षटकांच्या सामन्यात जे क्रिकेट खेळले जाते, त्यात फरक असतो. तसे असले तरी नुकतेच ’आशियाई’ क्रीडाप्रकारात समाविष्ट असलेल्या आणि आता तर ’ऑलिम्पिक’ क्रीडाप्रकारात प्रवेश मिळवू पाहणार्‍या, या टी-२०च्या स्पर्धा प्रस्तावित आहेत. ‘आशियाई’ स्पर्धेत आपण टी-२०मध्ये सुवर्णपदक मिळवले आहेच.

टी-२०च्यादेखील ’विश्वचषक’ स्पर्धा दर दोन वर्षांनंतर आयोजित होत असतात. तसे पहिले आयोजन २००७ साली झाले होते. महिला आणि पुरूष अशा दोन्हींसाठी स्वतंत्र स्पर्धा होत असतात. त्यातील पुरुषांच्या स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आल्या होत्या, तेव्हा त्यात १२ देशांचा समावेश होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जोहान्सबर्ग येथे अंतिम सामन्यात पाकिस्तानला पाच धावांनी पराभूत करून टी-२०चा चषक पटकावत टी-२० चषकाचा प्रारंभ आपण केला होता. त्यानंतर भारत २०१४ला १६ देशांमध्ये उपविजेता ठरला होता. २०२१ मध्ये कोरोनामुळे भारतात भरवण्यात येणार्‍या स्पर्धा तेव्हा मग संयुक्त अरब अमिरात आणि ओमानमध्ये खेळवल्या गेल्या होत्या. २०२४, २०२६, २०२८ व २०३० साली होणार्‍या स्पर्धेत आता पाच संघांच्या चार गटांत एकूण २० देश सहभागी असतील. टी-२०त ऑस्ट्रेलिया एकदा २०१० मध्ये इंग्लंड विरुद्ध पराभूत होत उपविजेता तर २०२१ मध्ये न्यूझीलंडला पराभूत करून, ऑस्ट्रेलिया विजेता ठरलेला आहे.

२०२४ मध्ये होणार्‍या टी-२० ’विश्वचषका’ला दि. ४ जूनपासून सुरुवात होणार आहे, तर दि. ३० जून रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या ’विश्वचषक’ सामन्याचं आयोजन हे वेस्ट इंडिजमधील सात आणि अमेरिकेतील तीन अशा दहा ठिकाणी करण्यात येणार आहे. पुरुषांच्या टी-२० समवेतच आपल्या नेत्रबधीर महिलादेखील ऑस्ट्रेलियावर वरचढ असल्याचे दिसून येत आहे. टी-२० मध्ये या महिलादेखील अग्रेसर होताना आपल्याला दिसतील. ’क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड इन इंडिया’ यांनी आयोजित केलेल्या महिला क्रिकेटच्या भारत-नेपाळ यांच्यात टी-२०च्या पाच सामन्यांच्या स्पर्धाही होणार आहेत. दि. ११ ते १५ डिसेंबर २०२३ दरम्यान होणार्‍या या स्पर्धा बेलापूर येथे होत असून, त्यात महाराष्ट्रातील गंगा संभाजी कदम हिची निवड करण्यात आली आहे. या महिलांनी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक संपादन करताना, ऑस्ट्रेलियाच्या महिलांना नऊ विकेट्सनी हरवले होते. महिलांच्या या स्पर्धांना फक्त पाच वर्षंच झाली आहेत.

आता परत एकदा ऑस्ट्रेलियाला टी-२०त पराभूत करण्याची संधी भारताला चालून आली आहे. तो आनंद समस्त भारतीयांनी आता घ्यायचा आहे. या टी-२०च्या विजयाने आपण ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय सामन्यात नमवता न आल्याच्या जखमेवर थोडीफार का होईना फुंकर घालता येईल आणि लोकांना गप्प करता येईल. एकदिवसीय ’विश्वकरंडक’ आपल्या हातून निसटला जरी असला तरी नुकतीच जी घोषणा ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटने’नी (आयसीसी) केली आहे, ती घोषणा आपल्या दृष्टीने खचितच आनंदाची आहे. यावेळीच्या ’विश्वचषक’ स्पर्धेतील सर्वोत्तम १२ खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या ’आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटने’च्या जागतिक संघात सर्वाधिक सहा खेळाडू हे भारतीयच आहेत. भारताला पराभूत करणार्‍या ऑस्ट्रेलियाचे मात्र केवळ दोनच खेळाडू त्या संघासाठी निवडले गेले आहेत. पाकिस्तानचा मात्र एकही त्यात नाही. या जागतिक स्पर्धेत जो संघ आहे, त्याचेही कर्णधारपद भारतीय कर्णधार रोहित शर्माकडेच सोपवण्यात आले आहे. हा जो संघ असतो, त्याला क्रिकेट विश्वात मोलाचे स्थान असते. रोहित शर्माने ज्या पद्धतीत देशाचे कर्णधारपद सांभाळले आणि आता जागतिक संघाचेही सांभाळणार आहे, त्यातून संघभावना कशी महत्त्वाची असते, हे अधोरेखित होत आहे.
 
तेव्हा क्रिकेटमध्ये भारताला आपले प्रभुत्व पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवायची संधी आता मिळणार आहे. त्यासाठी आता भारतीय संघ तयार होत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विशाखापट्टणम येथे दि. २३ नोव्हेंबरपासून ते दि. ३ डिसेंबरला बंगळुरूला संपणार्‍या या मालिकेत फलंदाज सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे, तर महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड हा पहिल्या तीन सामन्यांसाठी उपकर्णधार असेल आणि उर्वरित दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यर उपकर्णधार असेल. रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शामी, जसप्रित बुमराह अशा वरिष्ठ क्रिकेटपटूंना या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. यापूर्वी भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे असले, तरी तो सध्या दुखापतग्रस्त आहे. त्यामुळेच सूर्यकुमारकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया झाले की, आपल्याशी टी-२०च्या तीन सामन्यांच्या मालिकेत खेळायला अफगाणिस्तान दि. ११ ते १७ जानेवारीत मोहाली, इंदौर आणि बंगळुरू येथे येत आहेच.

ऑस्ट्रेलिया विरुद्धचे पाच सामने, नंतरचे अफगाणिस्तान समवेतचे तीन सामने आणि आगामी टी-२० ’विश्वचषका’च्या २०२४च्या जूनपर्यंत चालणार्‍या अन्य मोहिमेत सहभाग घेणार्‍या भारताला एकदिवसीय सामन्यात चषक संपादन करता आला नाही, तसा चषक आता मिळवण्याच्या मोहिमेत सहभागी असलेल्याला भारतीय संघाला आपण सारे शुभेच्छा देत, देशाप्रति सकारात्मक भावना बाळगू.
श्रीपाद पेंडसे
९४२२०३१७०४