मुंबई : वंचित बहुजन आघाडीकडून शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या महासभेसाठी प्रकाश आंबेडकरांसह त्यांचे हजारो समर्थक आणि भीम सैनिक एकत्रित येणार आहेत. एकीकडे प्रकाश आंबेडकरांच्या या रॅलीची चर्चा असताना महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरेचा या महासभेबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
गौरव मोरेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असून या व्हिडिओमध्ये त्याने महासभेसाठी आवाहन केले आहे. “जय भीम मी गौरव मोरे २५ नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान महारॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धेय, आदर्श बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. मी भारतीय नागरिक म्हणून भारतीय संविधानाप्रती असलेले कर्तव्य बजावू या आणि २५ नोव्हेंबरला जास्तीत जास्त संख्येने या महारॅलीत सामिल होऊ या. ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदान दादर. तर २५ नोव्हेंबरला नक्की या, जय भीम”, असे म्हणत गौरव मोरेने सर्वांना संविधान सन्मान महासभेला मोठ्या संख्येने येण्याचं आवाहन केले आहे.