राज्यातील महिलांना सुरक्षित मातृत्वाची हमी

महायुती सरकारकडून ६०० "सुमन" संस्थांची घोषणा

    25-Nov-2023
Total Views |
Suman Sanstha Maharashtra Government

मुंबई :
राज्यातील महिलांना सुरक्षित मातृत्वाची हमी देण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने ६०० 'सुमन' संस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी, २५ नोव्हेंबरला त्यासंदर्भात घोषणा केली.

सावंत म्हणाले, 'सुमन' संस्थांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्याचा आमचा मानस आहे. उच्च दर्जाच्या वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा देणे, लाभार्थ्यांना उपलब्ध सोयी सुविधांची नियमित माहिती देण्यासाठी त्वरित प्रतिसाद देणारी प्रभावी आरोग्य सेवा प्रणाली निर्माण करणे, स्वयंसेवी संस्था, स्वयंसहाय्यता गट, लोकप्रतिनिधी यांची १०० टक्के माता मृत्यूच्या नोंदणीसाठी मदत घेणे व त्या मृत्यूच्या अन्वेषणासाठी जनजागृती निर्माण करणे, आरोग्य सेवा पुरविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणात्मक सेवा देण्यासाठी प्रवृत्त करणे ही सुमन कार्यक्रमाची वैशिष्ट्ये आहेत. सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये येणाऱ्या सर्व गर्भवती महिला, नवजात बालकांना या कार्यक्रमांतर्गंत मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे.

तीन टप्प्यांत वर्गवारी

सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन) कार्यक्रमांतर्गत राज्यात चालू आर्थिक वर्षासाठी ६०० संस्थांची सुमन संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये ५३८ संस्था प्राथमिक, ४७ बेसिक इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यू बॉर्न केअर आणि १५ आरोग्य संस्थांची कॉम्प्रेहेन्सीव्ह इमरजन्सी ऑब्सेट्रीक अँड न्यू बॉर्न केअर या प्रकारात निवड करण्यात आली आहे.
- तानाजी सावंत, आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री