‘हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन सफर करा मस्तीने’ हे सोनू निगम यांनी गायलेले गाणे आपला जीवनप्रवासच खरं तर आपल्यासमोर आणून ठेवते. प्रत्येकाच्या जीवनात अडीअडचणी, सुख-दु:ख यांची रेलचेल सुरू असतेच; पण या सगळ्यातूनही आपले जीवन आनंदाने व्यतीत करणं, ज्यांना खर्या अर्थाने जमतं-त्या म्हणजे स्त्रिया! घर, संसार, मुलांचा सांभाळ या सगळ्या जबाबदार्या खांद्यावर पेलताना कुठेतरी स्वतःचं जगणं विसरलेल्या स्त्रिया कुटुंबाच्याच आनंदात आपला आनंद मानतात आणि हसत जीवन जगतात. मात्र, संसाराच्या गाडीला थोडासा ब्रेक मारत, नव्या देशात प्रवासाला निघत आपला आनंद स्त्रियांनी कसा जगावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ हा चित्रपट.
कोरोनाच्या संकटानंतर २०२१ साली प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट ‘झिम्मा-१’ खर्या अर्थाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणण्यात यशस्वी ठरला. स्वभाव, वागणं, विचारांची पद्धत अशा विविध तर्हा, स्वभाववैशिष्ट्य असलेल्या सात विविध वयोगटातील महिला परदेश सफरीवर जातात. कोणाचीही ओळख-पाळख नसताना या सर्व बायका एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी होतात. आता पुन्हा एकदा याच मैत्रिणी दोन वर्षांनंतर प्रवासाला निघाल्या आहेत. निमित्त आहे-इंदू डार्लिंगचा ७५वा वाढदिवस!
आता ‘झिम्मा-२’ या चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचे झाल्यास, ‘झिम्मा-१’ ज्यांनी पाहिला नसेल, त्यांना कुठेही या कथानकात कोणतीही कमतरता भासणार नाही. कारण, ‘झिम्मा-२’मध्ये अभिनेत्री मृण्मयी गोडबोले आणि सोनाली कुलकर्णी यांच्या जागी शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरू यांचा समावेश झाला असून, ‘झिम्मा-१’ मध्ये ज्या कारणांमुळे चित्रपटाचा शेवट झाला होता, ती कारणे या चित्रपटात उलगण्यात आली आहेत. आता ती कारणं नेमकी कोणती? तर मृण्मयी गोडबोले अर्थात रमा ही चित्रपटाच्या पहिल्या भागात मूल होण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यामुळे या भागात तिला मूल झाल्यामुळे लहान बाळाला सोडून ती परदेशी कशी येणार, असे दाखवत तिच्या जागी रिंकू राजगुरू अर्थात तानिया येते आणि ती मृण्मयीची अजिबात कमतरता भासू देत नाही. त्यानंतर सोनाली कुलकर्णी अर्थात मैथिली आणि तिच्या आईतील म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांच्यातील सर्व गैरसमज दूर होतात आणि ती लग्न करून सुखाने संसार करत असते. त्याचमुळे तिची जागा शिवानी सुर्वे अर्थात मनाली हिने घेतली आहे. त्यामुळे दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि लेखिका इरावती कर्णिक यांनी कुठेच कथेत कोणत्याही पात्राची किंवा घटनेची उणीव भासणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे.
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी ’झिम्मा-१’ आणि ’झिम्मा- २’मध्ये परदेशात विविध ठिकाणी चित्रीकरण केले असून, तेथील पर्यटनस्थळांचा योग्यरित्या वापर करत, प्रेक्षकांना घरबसल्या तेथील उत्तम स्थळांचे दर्शन घडवले आहे. चित्रपटात सात अभिनेत्री वेगवेगळ्या वयोगटांच्या महिलांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांच्यातील वैचारिक मतभेद, नात्यांबद्दलचा समज, समाजातील विविध विषयांवर भाष्य करण्याच्या तर्हा या उत्तमरित्या सादर केल्या आहेत. आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविध आजारांबद्दल चित्रपटाच्या कथानकाद्वारे समाजात त्याबद्दलची माहिती पसरवण्याचे काम केले जाते. ’झिम्मा-२’ या चित्रपटातही ’पार्किनसन्स’ या दुर्मीळ आजाराबाबत माहिती दिली असून, गोष्टीला साजेशी अशी गुंफण लेखिकेने करत, कुठेही या आजाराने ग्रस्त असणार्यांना त्याचा त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेतली आहे.
‘झिम्मा-२’मध्ये कथा, दिग्दर्शन, चित्रीकरणाची ठिकाणे यासर्वच बाबी अगदी ‘झिम्मा १’ पेक्षा अधिक सरस ठरल्या आहेत. तसेच पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग अधिक उजवा ठरला आहे. ‘झिम्मा-२’ची आणखी एक जमेची बाजू म्हणजे प्रत्येक अभिनेत्रीने सादर केलेला उत्कृष्ट अभिनय. वयाच्या ७५व्या वर्षांतही परदेशातील अफाट थंडी सोसत, अभिनय करणार्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी असोत किंवा ‘विनोदाची राणी’ म्हणून ओळख असणार्या निर्मिती सावंत असोत. चित्रपटात अनेक कठीण प्रसंगांतही विनोद कायम ठेवून, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी निर्मिती सावंत यांनी साकारलेल्या निर्मला या भूमिकेने घेतलेली दिसते, तर २१व्या शतकातील सून जी गावात वाढली-शिकली आहे, तिचे आचारविचार, नात्यांबद्दलची समज ही रिंकू राजगुरू हिने फार सुंदर साकारली आहे.
ऐन तारुण्यात प्रत्येक स्त्रीचे ‘बाईपण’ जपणार्या गोष्टीशी दोन हात करणारी आजची तरुणी म्हणून शिवानी सुर्वे तिच्या पात्रास अगदी खरी उतरली आहे. याशिवाय क्षिती जोग, सायली संजीव, सुचित्रा बांदेकर यांनीही उत्तम भूमिका साकारल्या आहेत. याव्यतिरिक्त चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेचे इतरांसोबतचे नाते, त्यांच्या वैचारिक जुळणार्या तारा प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त करतात. तसेच या सातही अभिनेत्रींचा म्होरक्या ठरलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने महिलांना समजणारा आदर्श पुरूष तंतोतंत साकारला आहे. आपली आई, बहीण किंवा इतर नात्यामंधील स्त्रियांची मने ओळखून, त्यांना त्यांचे स्वातंत्र्य अनुभवण्याची संधी देण्याचे काम दिग्दर्शकाने उत्कृष्टरित्या केले आहे, यात शंका नाही. प्रत्येक वयोगटातील महिलेने पाहावा आणि आपल्या जगण्याच्या व्याख्येत बदल करत जीवन जगावे, असा ‘झिम्मा’ चित्रपट खर्या अर्थाने बाईचं बाईपण जपण्यासाठी हातभार लावणारा आहे, यात शंकाच नाही.
चित्रपट : झिम्मा-२
दिग्दर्शक : हेमंत ढोमे
कलाकार : सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बादेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरु
रेटिंग : ४ स्टार
रसिका शिंदे-पॉल