मुंबई : अभिनेते प्रकाश राज यांना प्रणव ज्वेलर्स मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस पाठवली आहे. प्रकाश राज आपल्या परखड वक्तव्यांसाठी कायमच चर्चेत असतात. मात्र, आता ते ईडीच्या कचाट्यात अडकल्यामुळे पुढे त्यांच्या अडचणीत किती वाढ होणार आणि संपुर्ण प्रकरणाचा शेवट काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणी ईडीने २० नोव्हेंबर रोजी प्रणव ज्वेलर्सच्या जागेवर छापेमारी केली होती. या छापेमारीत ईडीने तेथून २० लाख रुपये आणि ११. ६० किलोचे दागिने जप्त केले होते. आता प्रकाश राज या कंपनीशी कसे जोडले गेले, तसेच पॉन्झी स्कीम चालवून लोकांची १०० कोटींची फसवणूक करणाऱ्या कंपनीबद्दल त्यांच्याकडे किती माहिती आहे याबद्दल विचारपूस करण्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजावले आहेत.
ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "तपासात असे दिसून आले आहे की प्रणव ज्वेलर्स आणि इतर संबंधित व्यक्तींनी सराफा/सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नावाखाली सार्वजनिक निधी बनावट संस्था/अॅक्सेस प्रदात्यांकडे हस्तांतरित करून जनतेची फसवणूक केली आहे." त्रिची स्थित प्रणव ज्वेलर्सने अधिक परतावा देण्याचे आश्वासन देऊन सोने गुंतवणूक योजनेच्या नावाखाली जनतेकडून १०० कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्यानंतरही प्रकाश राज यांनी याबद्दल अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.