चंदीगड : पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यातील एका गुरुद्वाराच्या मालकी हक्कावरून दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी निहंग शिखांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यावेळी एका निहंग शीखने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये एका हवालदाराचा मृत्यू झाला. अन्य पाच पोलीस जखमी झाले.
या घटनेनंतर या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत निहंग गटाच्या १० जणांना अटक केली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली जेव्हा सुमारे तीन डझन निहंगांनी गुरुद्वारा अकालपूर बुंग्यात घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. इतर निहंग गटांनी याला विरोध केला. यावरून दोन निहंग गटांमध्ये हाणामारी झाली.
कपूरथला एसपी तेजबीर सिंह हुंदल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जेव्हा पोलीस सुल्तानपूर लोधी भागातील या गुरुद्वारामध्ये पोहोचले आणि त्यांनी परिसर रिकामा करण्यास सांगितले तेव्हा निहंगांनी गोळीबार केला. त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुद्वारा संकुल रिकामे करताना एका निहंग शीखने केलेल्या गोळीबारात एक पोलीस हवालदार ठार झाला तर अन्य ५ जण जखमी झाले.
निहंग हा शीख योद्ध्यांचा समूह आहे. ते १६९९ मध्ये शिखांचे १० वे गुरु गोविंद सिंग यांनी खालशाच्या निर्मितीपासून त्यांचे मूळ मानतात. ते निळे कपडे आणि सजवलेल्या पगड्या घालतात. ते अनेकदा तलवारी, भाले यांसारखी शस्त्रे सोबत घेऊन जातात.निहंगांनी अशी वृत्ती पहिल्यांदाच दाखवलेली नाही. यावर्षी जुलैमध्ये लुधियानाच्या जारखार गावात गुरुद्वारा मंजी साहिबचा गोलक ताब्यात घेण्यासाठी गोळीबार करण्यात आला होता. यापूर्वी, २०२० मध्ये कोविड लॉकडाऊन दरम्यान निहंग आंदोलकांनी पटियाला पोलिस अधिकाऱ्याचा हात कापला होता.