आमदार अपात्रता प्रकरण : शिंदेंच्या वकिलांकडून सुनील प्रभूंची उलटतपासणी!

    22-Nov-2023
Total Views |

Shinde & Thackeray


मुंबई :
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी सुरु असून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी करण्यात येत आहे. २१ जूनच्या आमदारांच्या बैठकीबाबत सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपवरून शिंदे गटाचे वकील त्यांना प्रश्न विचारत आहेत.
 
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना तुम्ही कोणत्या अधिकाराने व्हीप काढला असा सवाल केला आहे. यावर पक्षप्रमुखांनी फोनवर दिलेल्या आदेशानुसार आपण व्हीप जारी केला असल्याचे सुनील प्रभु यांनी सांगितले आहे. त्यानंतर पक्षप्रमुखांनी लिखित व्हीप दिला होता का असा सवाल वकिलांनी केला आहे. तर ते आठवत नसल्याचे सुनील प्रभु यांनी म्हटले आहे.
 
यावर वकील जेठमलानी यांनी परत त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. तसेच गोल गोल फिरवू नका लिखित सूचना केल्या की नाही ते सांगा, असे वकिलांनी म्हटले. यावर प्रत्येक आदेश लेखी स्वरुपात येत नाही तर पक्षप्रमुख या नात्याने त्यांनी व्हीप जारी करण्याचे टेलीफोनिक आदेश दिले असल्याचे सुनील प्रभू यांनी सांगितले.
 
सुनील प्रभू म्हणाले की, "२१ जून २०२२ रोजी रात्री विधानपरिषद निवडणूकीच्या मतविभाजनानंतर एकनाथ शिंदेंसह काही आमदार गायब असल्याचे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या सुचनेवरून रात्री १० ते १०.३० वाजताच्या दरम्यान एका तातडीच्या बैठकीसाठी व्हीप काढला असल्याचे सुनील प्रभू यांनी सांगितले.