पाच दिवसांपूर्वी सॅम ऑल्टमन यांना ‘ओपनएआय’च्या संचालक मंडळाने कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली. पण, आता पुन्हा ऑल्टमन यांच्याकडे कंपनीचे सूत्र आली आहेत. ‘एआय’ क्षेत्रातील दिग्गज कंपनीमध्ये सुरू असलेल्या या सावळ्या गोंधळाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. त्यानिमित्ताने...
जगभरात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या विकासात आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात ‘ओपनएआय’ या कंपनीच्या ‘चॅटबॉट‘, ’चॅटजीपीटी’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या कंपनीच्या स्थापनेत सर्वाधिक योगदान आहे, ते ‘एआय’ क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखले जाणारे सॅम ऑल्टमन यांचे. पण, पाच दिवसांपूर्वी सॅम ऑल्टमन यांना ‘ओपनएआय’च्या संचालक मंडळाने कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ऑल्टमन यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टसारख्या बड्या कंपन्यांनीही रेड कार्पेट अंथरले. पण, आता पुन्हा वादावर पडदा टाकत सॅम ऑल्टमन यांच्याकडे ‘ओपनएआय’ कंपनीची सूत्र आली आहेत. तेव्हा, गेल्या पाच-सहा दिवसांपासून ‘एआय’ क्षेत्रातील या दिग्गज कंपनीमध्ये सुरू असलेल्या या सावळ्या गोंधळाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते.
’एआय’ हा गेल्या काही वर्षांत मानवी आयुष्याचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. बँकिंग सेवा असो की ऑनलाईन खरेदी, बहुतांश कंपन्या या ’एआय’ तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या ’चॅटबॉट’च्या माध्यमातूनच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करतात. एवढचं काय तर, तुम्ही तुमच्या सोशल मीडिया फीडमध्ये काय पाहता, याचा अभ्यास करून तुम्हाला तुमच्या आवडीचे व्हिडिओ पाहण्याचा सल्ला देण्याचे कामसुद्धा याच ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होते.
पण, ‘चॅटबॉट,’ ‘चॅटजीपीटी’ येईपर्यंत सर्वसामान्य इंटरनेट वापरकर्त्यांना याविषयी फार कमी माहिती होती. ’चॅटजीपीटी’ आल्यानंतर सर्वसामान्य लोकांना या तंत्रज्ञानाचा वापर करणे सोपे झाले. ’आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ हे अतिशय शक्तिशाली तंत्रज्ञान. याचा योग्य तो वापर केला नाही, तर त्याचे परिणाम भयानक होऊ शकतात. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या ’एआय’चा वापर करून बनवण्यात आलेला ‘डीपफेक’ व्हिडिओ चर्चेत होताच. पण, ’एआय’ तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल होणार आहेत. पण, अजूनही ’एआय’ तंत्रज्ञानाचा विकास पूर्णपणे झालेला नाही. भविष्यात या क्षेत्रात विकासाच्या अनेकानेक संधी उपलब्ध आहेत. जगाचे भविष्य निर्धारित करणार्या या तंत्रज्ञानाचा तज्ज्ञ म्हणून सॅम ऑल्टमन यांच्याकडे पाहिले जाते आणि ’एआय’च्या क्षेत्रात त्यांचे नावही तितक्याच आदराने घेतले जाते.
मानवासाठी सुरक्षित आणि फायदेशीर कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करण्याच्या उद्देशाने सॅम ऑल्टमन यांनी एलॉन मस्क यांच्यासोबत मिळून २०१५ मध्ये ‘ओपनएआय’ या कंपनीची स्थापना केली. तेव्हापासूनच सॅम ऑल्टमन हे कंपनीचे सीईओ होते. पण, कंपनीच्या अस्तित्वाच्या आठ वर्षांनंतर सॅम ऑल्टमन यांची कंपनीतून अचानक हकालपट्टी करण्यात आली आणि हा निर्णय साहजिकच सर्वांसाठीच अतिशय धक्कादायक होता.
‘एआय’ क्षेत्र विकसित होत असताना, या क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘ओपनएआय’ आणि तिचा संस्थापक ‘एआय’ क्षेत्रातील अनेकांसाठी देवासमान आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने एका निवेदनात म्हटले होते की, सॅम ऑल्टमन कंपनीच्या धोरणांविषयी आणि निर्णयांविषयी संचालक मंडळाशी स्पष्ट संवाद साधत नव्हते आणि त्यामुळे त्यांनी संचालक मंडळाचा विश्वास गमावला होता. ‘ओपनएआय’ ही कंपनी जरी ना-नफा संस्था म्हणून काम करत असली, तरी आजघडीला कंपनीचे बाजारमूल्य अंदाजे ८० अब्ज डॉलर्स इतके आहे. त्यासोबतच कंपनीमध्ये कोणत्याही आर्थिक अडचणीच्या बातम्या समोरही आल्या नव्हत्या.
कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये एलॉन मस्क, सॅम ऑल्टमन, ‘मायक्रोसॉफ्ट’, ’अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’, ‘इन्फोसिस’, ग्रेग ब्रॉकमन आणि वायसी रिसर्च यांचा समावेश आहे. ’ओपनएआय’, ‘चॅटबॉट’ सुरुवातीला पूर्णपणे मोफत होते.
पण, त्यानंतर कंपनीने आपल्या काही सेवांसाठी सबस्क्रिप्शन शुल्क आकारायला सुरुवात केली होती. कंपनीच्या सबस्क्रिप्शन सेवेलादेखील वापरकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे कंपनीला सबस्क्रिप्शन सेवा काही काळासाठी बंद करावी लागेल, अशी माहिती सॅम ऑल्टमन यांनीच काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे सॅम ऑल्टमन यांच्या नेतृत्वात ‘ओपनएआय’ सगळ्याच आघाडीवर चांगली कामगिरी करत होते. पण, कंपनीच्या पुढील वाटचालीबाबत संचालक मंडळात आणि ऑल्टमन यांच्यात मतभेद असल्याचे समोर आले आहे. कंपनी ना-नफा संस्था न ठेवण्याच्या मुद्द्यावरून संचालक मंडळात आणि सॅम यांच्यात वाद होता, असा दावा अनेक वृत्तसंस्थांनी केला आहे. याच विषयावर मतभेद निर्माण झाल्याने संचालक मंडळाने हा टोकाचा निर्णय घेतला होता, असे बोलले जाते. या निर्णयानंतर कंपनीच्या कर्मचार्यांनी संचालक मंडळाच्या विरोधात बंड केले.
सॅम ऑल्टमन कंपनीत परत न आल्यास अनेकांनी नोकरी सोडण्याची धमकीही दिली. त्यामुळे संचालक मंडळावरसुद्धा आपला निर्णय वापस घेण्याचा दबाव वाढला होता. त्यातच सॅम ऑल्टमन यांनी संचालक मंडळाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्याबरोबरच ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीच्या ’एआय’ विभागाचा प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे सॅम ऑल्टमन आता ‘ओपनएआय’मध्ये परत येणार नाहीत, अशीच शक्यता निर्माण झाली होती. पण, सर्व संचालक मंडळासोबतचे सर्व हेवेदावे, मतभेद बाजूला ठेवून सॅम ऑल्टमन यांनी पुन्हा एकदा ’ओपनएआय’ची सूत्र हाती घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे ’एआय’ क्षेत्रातील या नाट्यमय घडामोडींवर अखेरीस काल पडदा पडला.
’एआय’ क्षेत्रात सॅम ऑल्टमन यांची ख्याती बघता, सर्वांसाठीच ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. कारण, सॅम ऑल्टमन हे ’एआय’ क्षेत्रातील तज्ज्ञच नाही, तर या तंत्रज्ञानामुळे जगाला भविष्यात उद्भवणार्या धोक्यांची पण त्यांना जाण आहे. तेव्हा, या तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच मानवाच्या प्रगतीसाठी, उत्थानासाठी होईल, हीच आशा!