मुंबई : मुंबईकरांना आकारण्यात येणार्या पाणीपट्टीत आठ टक्के दरवाढीसाठी जल अभियंता विभागाने मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्यांकडे नुकताच प्रस्ताव पाठवला होता. त्यावर शनिवार, दि. २५ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. परंतु, मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने पाणीपट्टीत प्रस्तावित केलेली दर सुधारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार रद्द करण्यात आली आहे, असे महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईकरांना सात तलावांमधून दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्यासाठी प्रशासकीय खर्चाबरोबरच ऊर्जा खर्च आणि सरकारी तलावातून घेतलेल्या पाण्यावरील खर्चही वाढला आहे. त्याचप्रमाणे शुद्ध पाणी आणि त्यात टाकण्यात येणारी औषधे यांचा खर्चही वाढला असून, पालिकेला येत असलेल्या खर्चाच्या तुलनेत मुंबईकरांना पाणीपट्टी आकारली जाते. दरवर्षी या खर्चात वाढ होत असते. याचा आढावा घेऊन लेखापाल विभागामार्फत पाणीपट्टीत वाढ सुचवली जाते. गेल्यावर्षी पालिका प्रशासनाने ७.१२ टक्के वाढ केली होती. तर यंदा ८ टक्के पाणीपट्टी दरवाढ प्रस्तावित करण्यात आली होती.
तथापि, मुख्यमंत्री शिंदे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांना निर्देश दिले आहेत की, यंदा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कोणतीही पाणीपट्टी दर सुधारणा करू नये. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून यंदा कोणतीही पाणीपट्टी दरवाढ केली जाणार नाही, असे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.