बांधकाम, बोगदा आणि बचावकार्याचे आव्हान...

    21-Nov-2023   
Total Views |
uttarakhand-tunnel-crash-drilling-rescue-operation

दि. १२ नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमधील बांधकामाअधीन बोगद्याचा भाग कोसळल्यानंतर अडकलेल्या ४० मजूरांना सुखरुप बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सरकारतर्फे सुरु आहेत. मजूरांना अन्न, पाणी, ऑक्सिजन पुरवठा सुरळीतपणे होईल, याची पुरेपूर खरबदारी बचाव पथकातर्फे घेतली जात आहे. तज्ज्ञांच्या मदतीने सुरु असलेल्या या बचावकार्याच्या निमित्ताने, बोगद्याचे बांधकाम, त्या बांधकाम प्रक्रियेतील आव्हाने आणि एकूणच सुरु असलेले बचावकार्य यांचा आढावा घेणारा हा लेख...

उत्तराखंडामधील उत्तरकाशीत ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा ते डांडालगावदरम्यान बांधकामामधील बोगद्याचा भाग रविवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी कोसळला. त्या बोगद्याखाली ४० कामगार अडकले असून दुर्घटनेची माहिती मिळताच, ’राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल’ आणि ‘राज्य आपत्ती प्रतिसाद दला’च्या जवानांनी शोध आणि बचावकार्य शर्थीने सुरू ठेवले आहे. अडकलेल्या कामगारांना श्वास घेण्यास अडचण पडू नये, म्हणून बोगद्याच्या कोसळलेल्या भागात प्राणवायू नलिका टाकण्यात आल्या आहेत. तसेच कामगारापर्यंत अन्नपदार्थही पाठवले जात आहेत. हे बोगद्याचे काम ४ हजार, ५३१ मीटर लांब करण्याचे आहे. ’नॅशनल हायवे अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड’ने ’नवयुग इंजिनिअरिंग लिमिटेड’ कंपनीबरोबर भागीदारी करून बोगद्याचे काम हाती घेतले होते. एकूणच या कामाच्या कंत्राटाची किंमत ८५४ कोटी इतकी आहे.
बोगद्याच्या वरील बाजूचा सुमारे ५० मीटर भाग कोसळला असून, तो बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. बचाव पथकातील सुमारे १६० जवान विविध यंत्रसाधनेच्या साहाय्याने अडकलेल्या कामगारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कमांडिंग ऑफिसर नमन नरुला व साहाय्यक कमांडंट जाधव वैभव यांच्या नेतृत्वाखालील ’बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ (बीआरओ) आणि ‘इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस’(आयटीबीपी) यांची पथकेही बचावकार्यात सामील झाली आहेत. दुर्घटना कशी घडली व जबाबदार कोण? या प्रश्नापेक्षाही अडकलेल्या कामगारांची सुटका करण्याची कामे बचावपथके प्राधान्याने करत आहोत, असे उत्तर काशीच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले. उत्तराखंडाचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी घटनास्थळी तत्पर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला व बचावकार्य कामे वेगाने करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत. अडकलेले सर्व ४० मजूर (१५ झारखंडमधील, आठ उत्तर प्रदेशातील, पाच ओडिशातील, चार बिहारमधील, तीन पश्चिम बंगालमधील, प्रत्येकी दोन उत्तराखंड व आसाममधील व एक हिमाचल प्रदेशातील) सुरक्षित असून त्यांच्याशी संपर्क स्थापित झाला आहे. या सर्व मजूरांची सुटका होण्यास अजून दोन दिवस लागण्याची शक्यता आहे, असे बचावपथकाच्या प्रमुखाने सांगितले.
 
बोगद्यात बोगदा घालून सुटकेचे प्रयत्न

अडकलेल्या मजुरांना इतरत्र हलविण्यासाठी हायड्रॉलिक जॅकच्या आत ९०० मिमी व्यासाची पोलादी नळी घालण्याची योजना आहे, अशी माहिती या बोगद्याचे काम करणार्‍या ’नॅशनल हायवेज अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’नी (NHIDCL) दिली. बोगद्यात पडणारा चिखल हटविणे, बचावकार्यात अडथळा आणणारा सुट्टा राडारोडा शॉर्टकट पद्धतीने हटविणे, कँाक्रीटची फवारणी करून बोगद्याची स्थिती स्थिर ठेवणे ही इतर कामेसुद्धा सुरू आहेत.

दिल्लीहून नवीन ड्रिल मशीन आणले

बोगदा खणण्याचे काम गेल्या रविवारपासून थांबवण्यात आले. पण, ४० मजूर बोगद्याच्या ६५ ते ७० मीटर लांब भिंतींच्या ठिकाणी आत अडकून पडले. त्यामध्ये मुख्यत्वे डेब्रिज साचले होते. स्प्रेड कँाक्रीट टाकूनही डेब्रिज पडणे थांबले नाही. मजुरांना बाहेर काढण्यासाठी १४ तारखेपासून मोठ्या क्षमतेचे अमेरिकन ड्रिल मशीन डेब्रिज दूर करण्यासाठी व पोलादी नलिका आत घालण्यासाठी वापरण्यात आले. परंतु, वाटेत मोठा खडक लागल्याने, त्याचा वापर थांबवावा लागला. १६ तारखेपासून मोठे ’ऑगर स्टेट ऑफ दि आर्ट मशीन’ जे दिल्लीहून घटनास्थळी आणून कामाला वेग यावा, म्हणून डेब्रिज वापरण्यासाठी घेतले. परंतु, हे मशीनही २२ मीटरपर्यंत काम झाल्यावर एका खडकामुळे अडचण येऊन क्राकींग आवाज आल्यामुळे व मशीन बिघडल्याने थांबवण्यात आले. त्यानंतर तिसरा प्रयत्न करण्याची तयारी सुरू करण्याविषयी विचारमंथन झाले. कारण, शंका निर्माण झाली की, दुसर्‍यांदा बोगदा कोसळणे झाले असावे. आडवे व त्यानंतर उभ्या आलटून पालटून पद्धतीने ड्रिल मशीन वापरण्यात आले. या यंत्राच्या मदतीने २४ मीटर डेब्रिजचा ढिगारा हटविण्यात आला. एकूण ६० मीटर हटविण्याचे काम करावयाचे आहे. ८०० व ९०० मिमी व्यासाच्या नलिका एकापाठोपाठ टाकल्या जात आहेत. कामाला अपेक्षित वेग देता आलेला नाही. या नलिका यंत्रावर इष्ट पद्धतीने चढविणे व वेल्डिंग करणे यात जास्त वेळ खर्च होत आहे. ड्रिलिंग मशीन डिझेल इंधनावर चालविले जात आहे, त्यातही वेळ खर्च होत आहे. इंदौरहून आणखीन एक ऑगर यंत्र घटनास्थळी आणण्यात आलेले आहे.

मजुरांच्या आरोग्याच्या कामाकरिता बोगद्याच्या बाहेर एक आरोग्य विभाग सुरू करण्यात आला असून त्यात सहा पलंग, दहा अग्निशमन वाहने, डॉक्टर्स व मदतगारांची मदत, लागणारी औषधे (मल्टी-व्हिटॅमिन्स, बेकोझ्युल्स झेड, अँटीडिप्रेझन्ट्स) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणून ठेवली. अडकलेल्या मजुरांच्याकरिता साच दिवस फार कठीण अवस्थेत गेले आहेत.

बोगद्याचे काम कसे होते?
 
बोगद्याचे काम साधारणपणे डोंगराळ भागात केले जाते. मोठ्या दगडावर वा चिकणमातीवर काम करून, ती तोडावी लागतात. दगडाचे साधारणपणे तीन प्रकार असतात. ’अग्निरूप’ (Igneus) तो ज्वालामुखीतल्या लाव्हामधून थंड होऊन निर्माण होतो. दुसरा ‘गाळाचा दगड’ (Sedimentary) हा गाळातून बनतो, जसा पाटीचा दगड त्यात दगडाचे कित्येक थर असतात. तिसरा प्रकार ‘रुपांतरित’ (Metamorphic) हा दगड रुपांतरात बदलला जातो. या बोगद्याचे काम सध्या हिमालय पर्वतरांगांच्या भागात सुरू आहे. त्यामुळे येथे दगडांचे मिश्रण झालेले आहे. बोगदा करण्याचे काम जशी दगडांची जशी स्थिती असते, त्याअनुषंगाने योग्य ते बदल करुन करावे लागते.

हा उत्तरकाशीमधील बोगद्याच्या कामाच्या वेळी बोगद्याच्या तोंडापासून २०० ते ३०० मीटर अंतरापर्यंत ढिले व तडा गेलेले खडक सापडले असावेत, पाण्याची मिसळ त्यात झाल्यामुळे त्या हलक्या खडकांवर आणखीन तडे गेले असतील व ते कच्चे काम कामाच्या गडबडीत पाहण्यात आलेले नसावेत. या गडबडीत तो भाग कोसळला असावा.

बोगदा खणणे दोन पद्धतीने केले जाते. दगडांना भोके पाडणे व स्फोट घडविणे (ड्रिल व ब्लास्ट डीबीएम). स्फोट झाल्यानंतर तुटलेले खडक खाली पडतात. दुसरी पद्धत टनेल बोअरिंग मशीन-‘टीबीएम.’ ही ‘टीबीएम’ मशिन्स फार महाग असतात. भारतात ही मशिन्स कामासाठी परदेशातून आयात करावी लागतात. त्यांची किंमत २०० कोटी रुपयांच्या घरात असू शकते. ‘टीबीएम’ मशीन उंच डोंगरात काम करण्याची नसतात. १०० ते २०० मीटर उंच जागी ही मशिन्स तोडण्यासाठी वापरली, तर तेथे पोकळी निर्माण होऊ शकते व तो भाग निष्काम बनतो व कोसळतो. ४०० मीटर उंचीच्या कामात ही मशीने वापरता येतात. दिल्ली मेट्रोच्या कामात भुयारे खणण्यासाठी ‘टीबीएम’ मशीन वापरली गेली; पण जम्मू-काश्मीर व उत्तराखंडातील हिमालयांच्या सान्निध्यामध्ये ‘टीबीएम’ कामाला येऊ शकत नाही, तेथे ’डीबीएम’ म्हणजे ’ड्रिल व स्फोट करावे लागतात.

बोगदा खणण्याआधी जागेची पाहणी ’सिस्मिक रिफ्रॅक्शन वेव्हज’ने केल्यावर डोंगराचे नमुने तपासून, त्या खडकांच्या शक्तीची चाचणी घ्यावी लागते. ते घट्ट वा ढिले आहेत का, ते तपासावे लागते. भारतात बोगदा अभियंते खडकाचे ’बोअरहोल’ नमुने घेतात व त्या नमुन्याचे पेट्रोग्राफिक पृथक्करण केले जाते (सूक्ष्मदर्शिकेने त्यात किती व कोणत्या प्रकारच्या धातूंचे मिश्रण आहे, ते बघितले जाते व मॅकेनिकल शक्ती किती ते ठरविले जाते.)

बोगद्याचे काम स्थिर करणे म्हणजे काय?

खोदाई करणे व डोंगरातील खडक तोडणे ही कामे झाल्यावर माती व डेब्रिज पडणे थांबवण्यासाठी बोगद्याच्या भिंतीना टेकू (सपोर्ट) द्यावा लागतो आणि त्यानंतर शॉटक्रिटसारखे स्प्रेड कँाक्रीट टाकावे लागते. यातून बोगद्याचे काम स्थिर बनते. बचतकार्याच्या प्रमुखांनी सांगितले की, बोगद्याच्या आत दोन किमीच्या रिकाम्या जागेत हे मजूर अडकले आहेत. या अंतरापर्यंत प्रकाश पोहोचत आहे व त्यांच्यापर्यंत पाईपद्वारे अन्न आणि पाणी पाठविले जात आहे. हे उरलेले बचावकार्य आम्ही दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. कामगारांच्या सुटकेसाठी बचाव पथकानी नॉर्वे व थायलंडच्या तज्ज्ञांशी देखील चर्चा केली आहे. थायलंडमध्ये १७ दिवस गुहेत अडकलेल्या १२ मुलांची आणि त्यांच्या फूटबॉल प्रशिक्षकांची सुटका करणार्‍या थाय कंपनी बरोबरही केंद्र सरकार सतत ऑनलाईन चर्चा करत आहे. आपण या मजुरांशी बोललो आहोत व त्यांचे मनोबल अत्यंत दृढ ठेवले आहे.

तेव्हा, आता या कामगारांची लवकरात लवकर सुखरुप सुटका व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.