दिग्दर्शक प्रसाद खांडेकर सोबत १७ विनोदवीर म्हणत आहेत 'एकदा येऊन तर बघा'

    21-Nov-2023
Total Views |

movie 
 
मुंबई : मोठ्या पडद्यावर एकाच वेळी १७ विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट फुलंब्रीकर या कुटंबात घडणाऱ्या एका रहस्यमय घटनेवर आधारित विनोदी चित्रपट आहे.
 
या फुलंब्रीकर कुटुंबाच्या हॉटेल व्यवसायात कोणकोणते ट्विस्ट येणार? याचा उलगडा पुढच्या महिन्यात म्हणजेच ८ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात होणार आहे. तर, फुलंब्रीकर या एका गावातील सामान्य कुटुंबाला अचानक २० लाख रुपये मिळतात आणि पुढे हे कुटंब एक नवीन हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या हॉटेलमध्ये नेमके कोणते पाहुणे येणार, त्या पाहूण्यांपैकी एकाच्या मृत्यूनंतर काय ट्विस्ट येणार हे लवकरच उलगडणार आहे.
 
'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांनी केले असून याशिवाय चित्रपटात तब्बल १७ विनोदवीर भूमिका साकारणार आहेत. यामध्ये सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, भाऊ कदम, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसटकर, वनिता खरात, रोहित माने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, जय चौबे, राकेश शालिन आणि स्वत: प्रसाद खांडेकर यांचा समावेश आहे. तर हा विनोदाचा धमाका असलेला चित्रपट ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.