राहुल गांधींच्या आध्यात्मिक गुरुवर लैंगिक शोषणाचे आरोप; पॉक्सो अंतर्गत अटक
21-Nov-2023
Total Views |
बंगळुरू : कर्नाटक पोलिसांनी चित्रदुर्ग मुरुगराजेंद्र बृहन मठाचे महंत शिवमूर्ती शरण यांना अटक केली आहे. सोमवार २० नोव्हेंबर रोजी पॉक्सो अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवमूर्ती शरण यांनी कर्नाटक निवडणुकीच्या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दीक्षा दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, महंत शिवमूर्ती शरण यांच्यावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे दोन गुन्हे दाखल असून ते सध्या जामिनावर बाहेर होते. चित्रदुर्गातील न्यायाधीश बीके कोमला यांनी शिवमूर्ती शरण यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तसेच मंगळवारपर्यंत त्यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते.
त्यानंतर पोलिसांनी काही तासांतच महंत शिवमूर्ती शरण यांना अटक केली आहे. शिवमूर्तीला दावणगेरे येथील विरक्ता मठातून अटक करण्यात आली आहे. महंत शिवमूर्ती शरण यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही प्रकरणांच्या तपासादरम्यान पोलिसांनी शिवमूर्ती शरण यांना १ नोव्हेंबर २०२२ रोजी अटक केली होती. त्यानंतर जवळपास एक वर्षानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना १६ नोव्हेंबर रोजी पहिल्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला होता. मात्र, अवघ्या चार दिवसानंतर महंत शिवमूर्ती शरण यांना दुसऱ्या प्रकरणात जामीन न मिळाल्याने पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवमूर्ती शरण यांच्यावर म्हैसूरमधील नझराबाद पोलीस ठाण्यात ओदानदी सेवा संस्थान नावाच्या एनजीओने पहिला गुन्हा नोंदवला होता. यात त्यांच्यावर वसतिगृहात राहणाऱ्या दलित समाजातील अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच दुसरा गुन्हा दोन अल्पवयीन मुलींच्या आईने दाखल केला होता. शिवमूर्ती शरण यांनी २०१९ ते २०२२ या काळात वसतिगृहात असताना त्यांच्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा त्यांचा आरोप होता. विशेष म्हणजे महंत शिवमूर्ती शरण यांनी कर्नाटक निवडणुकीच्या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दीक्षा दिली होती.