नवी दिल्ली : भारतीय तरुणांमध्ये वाढलेल्या आकस्मिक मृत्यूसाठी करोना लसी नव्हे तर करोनानंतर रुग्णालयात दाखल होणे, आकस्मिक मृत्यूचा कौटुंबिक इतिहास आणि जीवनशैली; ही कारणे असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संशोधनामध्ये पुढे आले आहे.आयसीएमआरद्वारे ४७ रूग्णालयांच्या मदतीने १८ ते ४५ वयोगटाच्या निरोगी व्यक्तींच्या ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत मृत्यूंचे अध्ययन करण्यात आले होते. करोना लसीच्या एक नव्हे तर दोन मात्रांनी करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी केल्याचेही संशोधनात पुढे आले आहे.
या व्यक्तींच्या मृत्यूंचे कारण हे अस्पष्ट होते. आयसीएमआरद्वारे या व्यक्तींचे करोना लसीकरण आणि करोनानंतरची स्थिती अचानक मृत्यूचा कौटुंबिक इतिहास, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान आणि मृत्यूच्या दोन दिवस आधी तीव्र शारीरिक हालचालींची माहिती घेण्यात आली. माहितीच्या विश्लेषणानुसार, धूम्रपान, मद्यसेवन, अमली पदार्थांचे सेवन आणि तीव्र शारिरिक हालचाली हे मृत्यूचे कारण असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.
ज्यांना करोनच्या गंभीर संसर्गाने ग्रासले होते, त्यांनी अधिक शारिरीक मेहनत करू नये असे अहवालात सुचविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हृदयविकाराचा झटका टाळता यावा म्हणून त्यांनी धावणे आणि तीव्र व्यायामापासून थोड्या काळासाठी दूर राहिले पाहिजे, असेही संशोधनात सांगण्यात आले आहे.