मुंबई : एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरण्याची भारतीय क्रिकेट संघाची संधी यंदाही हुकली. रविवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून दारुन पराभव केला. भारताची झालेली ही हार प्रत्येक भारतीयांच्या मनाला चटका लावून गेली. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच समाज माध्यमावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाहूयात मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया...
दरम्यान, अंतिम सामना पाहण्यासाठी काही मराठी कलाकारंनी थेट स्टेडियममध्ये हजेरी लावली होती, तर काहींनी घरबसल्या मॅचचा आनंद घेतला होता. आणि सामन्याच्या अंतिम निकालानंतर आपल्या प्रतिक्रिया त्यांनी समाज माध्यमावर लिहून व्यक्त केल्या. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी फेसबुकर पोस्ट केली आहे की "हरणे, जिंकणे यालाच खेळ म्हणतात.. फायनल पर्यंत अजिंक्य असलेल्या इंडिया टीमचे आणि विजेत्या ऑस्ट्रेलिया टीमचे अभिनंदन .. वेल डन टीम इंडिया."
तर अभिनेते-दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणतात, “दोन्ही टिम्समध्ये आज एकच फरक होता तो म्हणजे ‘Head’…चा! टीम ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन आणि आमच्या भारतीय संघामुळे आम्ही या संपूर्ण विश्वचषक स्पर्धेचा आनंद घेऊ शकलो त्यामुळे त्यांचं देखील कौतुक”
अभिनेता गश्मीर महाजनीने तर या मॅचबद्दल भन्नाट प्रतिक्रिया लिहिली आहे, गश्मीरने लिहिले आहे की, “बच्चन साब ने चुपके से मॅच देख लिया”. त्याच्या या प्रतिक्रियेची पार्श्वभूमी अशी आहे की, महानायक अमिताभ बच्चन यांनी "मी जेव्हा सामना पाहत नाही तेव्हा भारत जिंकतो," असे ट्विट केले होते.
यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे याने "आशा ही एक चांगली गोष्ट आहे, कदाचित सर्वात चांगली गोष्ट आहे आणि कोणतीही चांगली गोष्ट कधीही मरत नाही," असे लिहिले आहे.
तर अभिनेता अभिजीत केळकरने पोस्ट शेअर करत “हा ऑस्ट्रेलियाचा हेड (ट्रेव्हिस हेड)आता माझ्या हेडमध्ये जातोय” असं म्हटलं आहे. तसेच प्रिया बापट आणि सई ताम्हणकर यांनी भावुक होत इन्स्टाग्रामवर स्टोरीवर रडण्याचे इमोजी शेअर केले आहेत.